आंदोलनाआधी ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांनी सोडल्यानंतर तुषार गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
तुषार गांधी यांना आंदोलनाआधी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सोडल्यानंतर तुषार गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबईत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनीही पाठिंबा जाहीर केला होता. या आंदोलनाला जाण्यासाठी तुषार गांधी घरातून निघाले. परंतु या आंदोलनाला जाण्याआधी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं. आदित्य ठाकरे यांनीही थेट पोलीस स्टेशनला भेट दिली. काही तासानंतर पोलिसांनी तुषार गांधी यांना सोडलं. त्यानंतर तुषार गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
तुषार गांधी यांनी सांगितले की, पोलीस सकाळपासूनच घरापासूनच पाठलाग करत होते. जेव्हा ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाण्यासाठी निघालो, तेव्हा पोलिसांनी नॅशनल कॉलेज, वांद्रे येथून ताब्यात घेतले. आधी सांताक्रूझला नेले, नंतर डीएन नगर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे अनेक तास ठेवले. जेव्हा पोलिसांना कळले की, आदित्य ठाकरे त्यांना भेटायला येणार आहेत. तेव्हा मेडिकल चेकअपच्या बहाण्याने त्यांना बोरीवली पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तिथे पोलिसांनी सांगितले की, डीएन नगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू आहे आणि आदित्य ठाकरे त्यांच्याशी बोलू इच्छितात. त्यानंतर पोलिसांनी फोनवर आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले आणि नंतर त्यांना घरी सोडले’.तसेच ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचा फोन फ्लाइट मोडवर टाकला होता, असेही त्यांनी सांगितले.
‘मी सीजेपी प्रोटेस्टच्या समर्थनार्थ ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करणार होतो, पण मला ताब्यात घेतल्यानंतरही तिथे आंदोलन झाले आणि अनेकांना ताब्यात घेण्यात आले, ज्यात माझ्या मुलीचाही समावेश होता, असे त्यांनी सांगितले. मी अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो. पण आता ही बाब पुढे गेली आहे. आता ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचली आहे, असेही तुषार गांधी म्हणाले.
