
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे संकट असणार आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेच्या 28 जागा महा मेट्रोला मालकी हक्काने मिळणार आहे. १ मेपासून राज्यभर ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ उपक्रम सुरू झाला आहे. आता राज्यातील कोणत्याही तालुक्यात दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ९,४२६ खासगी ट्रॅव्हल्स बसपैकी ४९० बस आरटीओ तपासणीत ‘अनफिट’ आढळल्या आहेत. तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा २३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट आहे. याशिवाय देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेटस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजण्यात आली. ते अफगाणिस्तानातील फैजाबादच्या पूर्व आग्नेयेस 215 किमी आणि भारतातील गुलमर्गच्या वायव्येस 314 किमी अंतरावर होते. त्याची खोली पृथ्वीपासून 10 किलोमीटर खाली नोंदवली गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाली आहे. चर्चेदरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्युबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे सांगितले.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लावली. अनेक भागात जोरदार वादळी वारा, पाऊस व गारपीट झाली. मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पावसाची तयारी केली जात आहे. त्याची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस होऊ शकते. आयआयटी कानपूरला हिरवा कंदील मिळाला आहे. यासाठी २ उड्डाणांद्वारे ढगांमध्ये रसायने फवारली जातील. यानंतर पाऊस पडेल. क्लाउड सीडिंगसाठी, प्रत्येकी 1.5 तासांच्या दोन उड्डाणे चालवली जातील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकींचे सत्र सुरुच आहे. राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षणमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यासोबत ही बैठक असणार आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबतही चर्चा होणार असल्याचं सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने कारवाई केली आहे. भारताने पाकला जाणारं चिनाबचं पाणीही रोखलं आहे. भारत आता पाकला जाणारं झेलमचं पाणी रोखण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांकडूनम माहिती मिळत आहे.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय असणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. काश्मीरमधील विश्वा नदीत उडी मारून इम्तियाज मगरेने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. इम्तियाज मगरेवर दहशतवाद्यांना अन्न पुरवल्याचा संशय असल्याचं म्हटलं जात आहे.
परभणी – लोकशाही आपण जिवंत ठेवली नाही, तर कोणी समोर येणार नाही. भाजप जे विष परत आहे, ते मुळांपासून उपटून टाकू,
हर्षवर्धन सपकाळ तुमच्या समोर मोठं आवाहन आहे,आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अतिरेक्यांना मदत केल्याचा संशय असलेल्या तरूणाची आत्महत्या. काश्मीरमधील विश्वा नदीत उडी मारून इम्तियाज मगरेने केली आत्महत्या. दहशतवाद्यांना अन्न पुरवल्याचा संशय इम्तियाज मगरेवर होता. त्याचा तपास सुरू होता.
कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डायव्हर्जनच्या ठिकाणी दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू,तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.
लहुबाई अश्रुबा वाघमारे (49, रा. वाघजाईनगर,आंबेगाव खुर्द) असे अपघातात प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे.दुचाकी चालवत असलेल्या प्रियांका राऊत (33) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
परभणी – काँग्रेसची सद्भावना यात्रा परभणी शहरातून अक्षदा मंगल कार्यालय येथे दाखल झाली. तेथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, रमेश चेन्निथला, खासदार प्रणिती शिंदे, माणिकराव ठाकरे सतेज पाटील आदी नेते उपस्थित आहे. कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
७५ टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ इतकी आहे. यात फर्स्ट क्लास आणि त्याच्या पुढे संख्या ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ इतके आहेत. तर ३५ टक्के ते ४४.९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ इतकी आहे. असे एकूण १४ लाख ६४ हजार ६०१ पैकी एकूण १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
मागच्या चार वर्षातील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच प्रमाण जाणून घ्या.
२०२२- ९४.२२ टक्के
२०२३- ९१.२५ टक्के
२०२४ – ९३.३७ टक्के
२०२५ – ९१.८८ टक्के
मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे
मुलींची पास होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्याने अधिक आहे. एकूण १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागलाय
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून ४२ हजार ३८८ रिपीटरर्सनी नोंदणी केली. ४२ हजार २४ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी १५ हजार ८२३ पास झाले. एकूण रिपीटर विद्यार्थ्यांच उत्तीर्ण होण्याच प्रमाण ३७.५४ टक्के. ७ हजार ३१० दिव्यांग विद्यार्थी नोंदणी. ७ हजार २५८ विद्यार्थी परीक्षेला बसले. ६ हजार ७०५ पास झाले. निकाल टक्केवारी ९२.३८ टक्के
कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक. लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी. मुली ९४.५८ टक्के उत्तीर्ण, मुले ८९.५१ टक्के उत्तीर्ण..
पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजी नगर, लातूर या 9 विभागातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय, आयआयटी यातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले. 88 टक्के निकाल लागला.
मुंबईत बाळासाहेब भवनात महत्त्वाची बैठक. परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक याची परिवहन अधिकाऱ्यांसोबत बैठक. परिवहन विभागाच्या होणाऱ्या ऑनलाइन बदल्यांसह विविध विषयावर बैठक सुरू.
अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणात एजाज खान वाँटेड असून चारकोप पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चारकोप पोलीस त्याच्या घरी गेले, पण तो घरी नव्हता. एजाजला कधीही अटक होऊ शकते. एजाज खानविरुद्ध मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेनं त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
“अजित पवार आणि शरद पवार हे एकमेकांना भेटतात. ते संस्थात्मक कामांसाठी भेटतात आणि ते आवश्यक आहे. पण राजकीयदृष्ट्या शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत. हे घाबरून पळून गेलेली लोकं आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण ते होणार नाहीत. अजित पवार हे कदापि भाजपबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. एकतर त्यांना त्यांचा पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये विलिन करावं लागेल. मग भाजपचे म्हणून कदाचित भविष्यात त्यांना संधी मिळेल. पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्रीपद मिळणार नाही”, असं मत राऊतांनी मांडलंय.
“दुसऱ्यांचं फोडा आणि आपलं वाढवा अशी त्यांची विचारधारा आहे. स्वत:च्या विचारांची रेष ते अजिबात वाढवायला तयार नाहीत. बावनकुळे यांच्यासारख्यांकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, काँग्रेस फोडा.. आता ते शिंदेंची शिवसेनाही फोडणार आहेत. ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहेत. जर मुघलांना स्वप्नात संताजी, धनाजी दिसायचे, तसं यांना स्वप्नात फक्त फोडाफोडी दिसते”, असं संजय राऊत म्हणाले.
“ज्या लोकांनी मोदींवर, वीर सावरकर, संघावर टीका केली, ज्यांनी संघातील लोकांची ‘हाफ चड्डीवाले’ असं म्हणून अवहेलना केली, त्यांना घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एवढं करूनसुद्धा यांची भूक भागत नाही. फक्त फोडा, फोडा आणि फोडा. याचं कारण, त्यांचे जे नेते आहेत.. अमित शाह.. यांची विचारधारा तीच आहे”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
“उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल, तेव्हा यांची सूज उतरलेली असेल. चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तर त्यांनी हे विधान नसतं की काँग्रेस फोडा, अमूक फोडा. तुमचा पक्ष विचारधारेवर वाढवा. महाराष्ट्रातील आजचा भारतीय जनता पक्ष हा 70 टक्के उपरांचा पक्ष आहे”, असंही राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, प्रमोद महाजन यांनी केलं. देशाच्या स्तरावर हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला. अर्थात अटलजीसुद्धा आहेत. आता बावनकुळेंसारख्या मंडळींनी सत्तेचा आणि पैशाचा मधमस्त वापर करून, इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भाजप नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दक्षिण सोलापुरातील विंचूर गावात गॅसचा स्फोट… गॅसचा स्फोट झाल्याने चार घरांचे नुकसान…
काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता… जिल्ह्यात ढगाळ वातावरण मुळे तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता… हवामान खात्याची माहिती… शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी… कृषी विभागाचे आहवान
महापालिकेच्या बीफ मार्केटच्या जाहिरातीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची मध्यस्ती… कोणत्याही परीस्थितीत बीफ मार्केट होऊ देणार नसल्याची आमदार देवेंद्र कोठेंची भूमिका… महापालिकेकडून प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट उल्लेख झाला असून त्याठिकाणी मटण मार्केट होणार… त्याबाबत महापालिका शुद्धीपत्रक काढणार आहे…. तर मुळेगाव कत्तलखान्यात कोणत्याही प्रकारचे बंदी असलेले पशुधन कापले जाणार नाही… त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, एक वेटर्नरी डॉक्टर आणि गोरक्षकांसह समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी विविध संघटनांची बैठक बोलवली आहे..
निफाड कोर्टात दुपारपर्यंत निर्णय येण्याची शक्यता… कोरोना काळात जमाबंदी असताना खांदा निर्याती संदर्भात केले आंदोलन… न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
जळगाव जिल्ह्यातील एकूण १३७१ योजनापैकी जलजीवन मिशनच्या केवळ ३०० योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. परंतु कामांचा वेग अतिशय संथ असल्याने १ हजार योजना अद्यापही अपूर्ण असल्याचे चित्र आहे.
सलग अकराव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आले. काल रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागात पाकिस्तानकडून गोळीबार केला गेला.
मुंबईतील १६ मॉल्सना अग्निसुरक्षा नियमभंगाबद्दल नोटिसा देण्यात आले आहे. त्यापैकी तिघांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे येथील क्रोमा शोरूम आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशामक दलाने १६ मॉल्सना नोटिसा दिल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांत उन्हाचा पारा चार अंशाने कामी झाला आहे. शुक्रवारी 44.3° वर असणारा उन्हाचा पारा रविवारी 40.6 अंशांवर गेला. सोलापुरात हवेचा दाब कमी झाल्याने आद्रता वाढून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा २३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. १५ मेपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई मनपाने म्हटले आहे. त्यामुळे १५ मे नंतर मुंबईत पाणी कपात होण्याची शक्यता आहे.