
पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवालात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. रुग्णालयाकडून अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष समितीने या अहवालात काढला असून हा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर रुग्णालयानेही याप्रकरणी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामराने ‘बुक माय शो’ला पत्र पाठवून यादीतून काढू नये (डिलीस्ट) किंवा आपला कार्यक्रम किती जणांनी पाहिला, किती उत्पन्न मिळालं याची माहिती द्यावी अशी मागणी केलीहोती. त्यावर “आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठी माध्यम आहोत. कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात”, असं उत्तर कंपनीकडून देण्यात आलं. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
२०२५ हे वर्ष पक्ष संघटनेला मजबूत करण्याचं आहे. देशात दबावाचं राजकारण सुरु असून येणाऱ्या समस्यांसंदर्भात आम्ही चर्चा करीत आहोत.जयपूर प्रस्ताव अंमलात आणला जाणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची मुळ खोलवर गेली आहेत असे काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे
तीन आठवड्यापूर्वी मोसंबीचे दर होते 22 ते 25 हजार रुपये प्रति टन होते, आता 18 हजार रुपये टन भाव मिळत आहे
पुण्यात भाजप महिला पदाधिकाऱ्याकडून सलून दुकानदाराला मारहाण करण्यात आली आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की “भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रात कायदा राखणार का, होना चित्रा वाघ? त्यामुळे इथून पुढे आता पोलीस आणि कोर्ट बंद करून टाका” असं वक्तव्य करत अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना थेट सवाल केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी, कोर्टाने शासनाला नोटीस बजावली आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”सोमनाथ सूर्यवंशीचा कोर्टाच्या कस्टडीत मृत्यू झाला आहे, याबाबत सखोल तपास झाला पाहिजे त्यासाठी कोर्टामार्फत SIT नेमावी” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरु होण्याआगोदरचं मुंबईतील मेट्रो स्थानक मनसेच्या रडारवर आलं आहे. नव्याने सुरु होणाऱ्या मेट्रो सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या बाहेरील फलकावर नाव इंग्रजीत लिहल्याने मनसेकडून ईशारा देण्यात आला आहे. मेट्रोला मराठीचा द्वेश आहे का? असा सवाल उपस्थित करत तात्काळ फलक मराठी करावा अन्यथा गाठ मनसेशी मनसेकडून ईशारा देण्यात आला आहे. मेट्रो प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यांनी बदललं नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असही मनसेनं म्हटलं आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करून पुणे पोलिसांनी लिहिलं पत्र… महिलेला ५.३० तास रुग्णालयात बसून ठेवल्याची बाब समोर… या सगळ्या प्रकरणी ससूनला लेखी पत्र लिहीत पोलिसांनी मागवली माहिती… मेडिकल निगलिजन्स आढळल्यास पुणे पोलीस करणार गुन्हा दाखल… या सगळ्या प्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहीत पोलिसांनी मागितलं स्पष्टीकरण… या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी पत्रासोबत जोडली असल्याची माहिती
मंत्री कार्यालयातील वेतन न झाल्याबाबत नवी वस्तुस्थिती समोर आली आहे. मंत्री कार्यालयातील 145 कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंतिम वेतन प्रमाणपत्र सादर न केल्यानं वेतन थकीत…
कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी जास्तीत जास्त कांदा विदेशात निर्यात होण्यासाठी 1 हजार रुपये सबसिडी दया… विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान दया… अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा…
कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई हाय कोर्टात पुढील सुनावणी 16 एप्रिलला. खार पोलीस ठाण्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी कामराने केली होती याचिका.
आषाढी यात्रेत पायी चालत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या वर्षी पहिल्यांदाच राबवले जाणार लठ्ठपणाचे आरोग्य अभियान. आरोग्य सल्लागार अर्जुन सुसे पालखी प्रमुखांना भेटून अभियानाची घेणार परवानगी. पालखी सोहळ्यात रोज पहाटे हरिनामाच्या जयघोषाबरोबर वारकरी दिसणार व्यायाम करताना. समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजून मला भाविकांची आषाढी यात्रेत सेवा करण्याची संधी पालखी प्रमुखांनी द्यावी अशी करणार मागणी.
वर्ध्याच्या तरोडा नजीक कारची टँकरला धडक, चौघे ठार. पोलीस कर्मचाऱ्याने त्याचे कुटुंबच अपघातात गमावले. एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी असे चौघे ठार. रस्त्यावर रानडुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित होऊन अपघात घडल्याची माहिती.
“सध्याच्या दरानुसार पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्याची लूट केली. शेअर बाजाराने खाली पडण्याचा रेकॉर्ड तोडलाय” असं संजय राऊत म्हणाले.
बीड: पाच मिनिटे उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. बीडमधील CET परीक्षेत सावळा गोंधळ समोर आला असून अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
बीडच्या नागनाथ सेंटर मधील घटना आहे. बस उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही.
गुजरात मधील अहमदाबाद मध्ये आजपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. थोड्याच वेळात सरदार वल्लभभाई पटेल स्मारक भवन मध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरू होणार आहे. आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसची रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
आकाशवाणी आमदार निवासात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विजय देशमुख यांचा कार्यकर्ता विशाल धोत्रे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. या निवासातील रूम नंबर 408मध्ये हा कार्यकर्ता रहात होता. रात्री 12.30 च्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला. धोत्रे यांच्या वडिलांना हृदविकाराचा झटका आला , त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आलं पण तेथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
इगतपुरी – घोटीच्या एका खाजगी शाळेत नववीच्या ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, व तंबाखू जन्य पदार्थ आढळले. उपमुख्याध्यापकांनी अचानक दप्तराची तपासणी केल्याने प्रकार आला समोर.
विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्यासमोरच संबंधित विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. तसेच चित्रविचित्र हेअर स्टाईल करून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपमुख्याध्यापकांनी केसही कापले .
एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात स्टिअरींग, एसटीचालकाचा प्रताप उघड झाला आहे. एसटी बस चालवताना ड्रायव्हरकडून मोबाईलचा वापर होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर- पुणे मार्गावरील कुर्डूवाडीजवळ हा प्रकार घडला. एसटी बस इंदापूर आगाराची असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे- 66 हजार बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावण्यात आला आहे. आरटीओच्या वायुग पथकाकडून आर्थिक वर्ष 2024 पंचवीस या कालावधीत 66 हजार 653 वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली. यात सिग्नल तोडणे, ओव्हर स्पीड, सीड बेल्ट नाही यांसारख्या विविध कारवाईचा समावेश आहे.
पुणे- शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट असून कोरेगाव पार्क 41.1 तर शिरूर 40.9 अंशावर पोहोचला आहे. रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.
पालघर- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज पालघर दौऱ्यावर आहेत. सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेची पाहणी केल्यानंतर पालघर मधील महामंडळाच्या बस स्थानकांची पाहणी करून आढावा घेणार आहेत. तसेच लोक दरबारात जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
नवी दिल्ली – निवडणुकांमध्ये VVPAT (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) स्लिपची १००% मॅन्युअल मोजणी करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याचिकाकर्ता हंसराज जैन यांनी ईव्हीएमसोबतच सर्व व्हीव्हीपीएटी स्लिपची १००% मॅन्युअल मोजणीही करावी अशी मागणी केली होती. तसेच मतदाराला स्लिप तपासण्याचा अधिकार मिळायला हवा असंही याचिकेत म्हटलं होतं. या मुद्द्यावर आधीच निर्णय देण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा सुनावणीची आवश्यकता नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील वर्षी २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टाने बैलट पेपरवर निवडणुका घेण्याशी संबंधित सोबतच EVM आणि VVPAT स्लिप्सची १००% क्रॉस-चेकिंग करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. परंतु या अस असताना कोर्टाने काही अटींसह EVM च्या तपासणीचा मार्ग मोकळा केला होता.
नाशिक – राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वधारले आहे. आपत्तीनंतरही दुबार लागवडीवर भर दिल्याचा परिणाम आहे. प्राप्त आकडेवारीनुसार राज्यभरात यंदा तब्बल ६.५१ लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली. गतवर्षाच्या तुलनेत एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्राने अधिक आहे.
कल्याण पूर्व कोळसेवाडी परिसरात आज दिवसभर वीज पुरवठा बंद राहणार आहे. नागरिक, व्यावसायिक आणि रुग्णालयांना याचा मोठा फटका बसणार आहे. पाल गावातील महावितरण उपकेंद्रात आज मंगळवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे लोकधारा फिडरवरून होणारा कोळसेवाडी परिसराचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.