Maharashtra Breaking News LIVE : भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 8:04 AM

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकार साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. आज बारामतीत मतमोजणी पार पडत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या १९ हजार ६५१ आहे. यंदा माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी विक्रमी मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘बळीराजा पॅनेल’, चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनेल’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनेल’ यांचा समावेश आहे. या तिन्ही पॅनेलमधील लढत कारखान्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, त्यामुळे आजच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मध्य रेल्वे कोलमडली आहे. तसेच नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक यांसह ठिकठिकाणी रात्रभर पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटाने धक्का दिला आहे. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jun 2025 07:59 PM (IST)

    भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर

    भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन मोडवर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपचा अॅक्शन प्लान ठरण्याची दाट शक्यता आहे.

  • 24 Jun 2025 07:48 PM (IST)

    शिंदे गटात इनकमिंग सुरुच, माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात करणार पक्षप्रवेश

    कोल्हापूर आणि सांगलीचे काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात करणार पक्षप्रवेश करणार आहेत. मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका लागला आहे.

  • 24 Jun 2025 07:03 PM (IST)

    एअर इंडिया हळूहळू पश्चिम आशियातील उड्डाणे पुन्हा सुरू करणार

    एअर इंडिया या विमान कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मध्य पूर्वेतील विमानसेवा हळूहळू सुरू केली जाईल. बहुतेक सेवा 25 जूनपासून पुन्हा सुरू होतील. युरोपमधील विमानसेवा मंगळवारपासून हळूहळू सुरू होतील. अमेरिका आणि कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील सेवा लवकरात लवकर सुरू होतील.

  • 24 Jun 2025 06:55 PM (IST)

    जपानने आपल्या हद्दीत पहिल्यांदाच क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या

    जपानने आपल्या हद्दीत पहिल्यांदाच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. देशाच्या लष्कराने मंगळवारी याची घोषणा केली. टाइप-८८ क्षेपणास्त्र, एक कमी पल्ल्याच्या जमिनीवरून जहाजावर मारा करणारे क्षेपणास्त्र, जपानच्या उत्तरेकडील मुख्य बेट होक्काइडोवरील लष्करी फायरिंग रेंजवर चाचणी घेण्यात आली.

  • 24 Jun 2025 06:43 PM (IST)

    श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेसंदर्भात आढावा बैठक

    श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेसंदर्भात आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. मुक्तागिरी बंगल्यावर थोड्याच वेळात या आढावा बैठकीस प्रारंभ होणार आहे. या बैठकीस शिवसेनेचे काही निवडक आणि महत्त्वाचे नेते तसेच उपनेते उपस्थित राहणार आहेत.

  • 24 Jun 2025 06:22 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून निवडण्यासाठी पुढील आठवड्यात निवडणूक

    एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून निवडण्यासाठी पुढील आठवड्यात शिवसेनेची संघटनात्मक निवडणूक होणार आहे.  प्रत्येक पक्षामध्ये पक्षप्रमुखांची निवडणूक ही संघटनात्मक कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते. अशाच प्रकारची प्रक्रिया शिवसेना पक्षामध्ये पुढील आठवड्यात राबवली जाणार आहे. शिवसेना पक्ष फोडीनंतर ज्या प्रकारचा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाला होता तशा प्रकारचे संघटनात्मक पेच टाळण्यासाठी शिंदे गट सावध झाला आहे.

  • 24 Jun 2025 06:15 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा

    भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही हलगर्जीपणा टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • 24 Jun 2025 06:07 PM (IST)

    महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचं मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड या शासकीय निवासस्थानी आयोजन

    महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचं मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड या शासकीय निवासस्थानी आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडून या बैठीकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, शिवसेनेकडून उदय सामंत आणि शंभुराज देसाई हजेरी लावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. तसेच महायुतीमध्ये एकमेकांवर होणाऱ्या टीकाटिप्पणीवरही खलबतं होण्याची शक्यता आहे. सध्या शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड पालकमंत्री पदावरून आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.

  • 24 Jun 2025 05:55 PM (IST)

    नाशिक: येवल्यात कॅफेच्या नावाखाली अश्लीलतेचा गोरखधंदा

    येवला शहर पोलिसांनी कॅफेच्या नावाखाली सुरू असलेला अश्लीलतेचा गोरखधंदा उधळला आहे. तीन कॅफेवर येवला शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईल दोन कॅफे चालकांना ताब्यात घेतले असून कॅफेचालक फरार झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.

  • 24 Jun 2025 05:44 PM (IST)

    परभणी: जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत गोंधळ

    परभणीत शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा एक हप्ता थकीत असल्याने खाजगी फायनान्स कंपनाने ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई केली. मात्र हप्ता भरून ट्रॅक्टर सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना फायनान्स कार्यालयात जोरदार गोंधळ घालत कार्यालयातच फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

  • 24 Jun 2025 05:30 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत पोलिस आणि रिक्षा चालकांमध्ये वाद

    कल्याण डोंबिवलीत चौथ्या सीटवर प्रवाशी बसल्यास कारवाई केली जात असल्याने पोलिस आणि रिक्षा चालकांचा वाद पेटला आहे. कारवाई थांबवा नाहीतर प्रवाशांना वेठीस धरून तीव्र आंदोलन करू असा इशारा रिक्षा मालक चालक संघटनेने दिला आहे. तर रिक्षात चौथ्या सीटवर प्रवासी बसवणं हे कायद्याच्या विरोधात आहे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणारच असं वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे.

  • 24 Jun 2025 05:16 PM (IST)

    मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात अनोखा जनता दरबार

     

    कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या जनता दरबारात मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागनिहाय टेबलची रचना करण्यात आली आहे. वाहतूक, बेस्ट, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, म्हाडा, एसआरए प्रशासनाचे अधिकारी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत.

  • 24 Jun 2025 04:55 PM (IST)

    सुदर्शन घुलेचा वाल्मीक कराडशी काहीही संबंध नाही, कराडच्या वकिलाचा दावा

    बीड – सुदर्शन घुलेचा वाल्मीक कराडशी काहीही संबंध नाही

    मोहन यादव कराडचे वकील यांचा दावा

    कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो तो आपल्या कटपुतल्यांच्या माध्यमातून दुष्कृत्य करत असतो-सरकारी वकील उज्वल निकम.

  • 24 Jun 2025 04:43 PM (IST)

    कर्ली नदीत वाहून गेलेल्या तरुणाचाएनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू 

    सिंधुदुर्ग : कुडाळ माणगाव खोऱ्यातील वसोली पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. माणगावमधून शिवापूरला जात असताना कॉजवेवर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याचे घटना काल रात्री घडली होती. त्या दुचाकीस्वाराचा शोध एनडीआरफच्या  पथकाकडून नदीपात्रात शोध सुरू असून कुडाळ पोलिसांची टीमसुद्धा उपस्थित आहे.
  • 24 Jun 2025 04:28 PM (IST)

    अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पाऊस

    नागपूर –  अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नागपुरात आज काही भागात  पावसाने हजेरी लावली
    साधारण स्वरूपाच्या पावसाची हजेरी
    नागपूरकर अनेक दिवसांपासून होती चांगल्या पावसाची अपेक्षा
    मान्सून दाखल झाल्यानंतर चांगला पाऊस आल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा
  • 24 Jun 2025 04:14 PM (IST)

    अतिक्रमण हटवण्यात आलेल्या मसाले व्यावसायिकाने सामूहिक आत्महत्या करण्यासाठी मागितली परवानगी

    छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आल्यानंतर या कारवाईदरम्यान कल्पतरू मसाले या व्यावसायिकाचा सुद्धा अतिक्रमण हटवण्यात आलं होतं. त्यामुळे आता या कल्पतरू मसाले हा व्यवसाय करणाऱ्या दांपत्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. हे अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आल्यामुळे या मसाले व्यावसायिकांचे प्रचंड मोठ नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

  • 24 Jun 2025 03:55 PM (IST)

    सुदर्शन घुलेवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीक कराडचा संबंध नाही – मोहन यादव कराडचे वकील

    सुदर्शन घुलेवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीक कराडचा संबंध नाही – मोहन यादव कराडचे वकील

  • 24 Jun 2025 03:46 PM (IST)

    राज्य सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न – प्रविण दरेकर

    महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे . एकूण १२ उमेदवारानी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मी मुंबई विभागीय विभागातून मी ही निवडणुक लढणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 24 Jun 2025 03:27 PM (IST)

    माझ्या मनात कोणतंही काळं नाही – भास्कर जाधव

    माझ्या मनात कोणतंही काळं नाही , कोणतेही भेदाभेद नाही, मी कोणतीही गोष्ट फसवून करणार नाही लपवुन करणार नाही असे शिवसेनेचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

     

  • 24 Jun 2025 03:11 PM (IST)

    अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेचा हातोडा सुरुच

    दिवा प्रभाग समिती अंतर्गत 17 इमारतीपैकी 13 अनधिकृत इमारतींवर ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई सुरु आहे. काल या ठिकाणी कारवाई रोखण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते. आज पुन्हा कारवाई सुरु असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 24 Jun 2025 02:55 PM (IST)

    डाटाच्या आधारावर पारदर्शक चर्चा झाली पाहिजे: सुप्रिया सुळे

    डाटाच्या आधारावर पारदर्शक चर्चा झाली पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसेच पालिका निवडणुकीत पारदर्शकपणे प्रभाग रचना झाली पाहिजे. आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • 24 Jun 2025 02:40 PM (IST)

    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता खंडेरायच्या जेजुरी नगरीत

    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता खंडेरायच्या जेजुरी नगरीत पोहोचली आहे. त्यापूर्वी वारकरी विसव्याला बसून देवाचे भजन करत फुगडी खेळत उत्सहात जेजुरीकडे निघाले आहे. सर्वत्र ज्ञानबा-तुकारामांचा जयघोष ऐकू येत आहे.

  • 24 Jun 2025 02:30 PM (IST)

    सोलापुरात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात

    सोलापुरात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. सोलापूर शहर आणि परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले आहे.12 ते 15 दिवसानंतर सोलापुरात पावसाचे आगमन झाले आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण तर काहींच्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पेरणीसाठी कडक उन्हाची आवश्यकता असताना अचानक पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.

     

     

  • 24 Jun 2025 02:10 PM (IST)

    निवडणूक आयोगाकडून राहुल गांधीना चर्चेसाठी निमंत्रण

    निवडणूक आयोगाकडून राहुल गांधीना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र राहुल गांधींकडून आयोगाल अद्यापतरी कोणतेही उत्तर देण्यात आलेलं नाही.

     

  • 24 Jun 2025 01:50 PM (IST)

    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी नगरीत पोहोचणार

    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अगदी काही वेळात आता खंडेरायच्या जेजुरी नगरीत पोहोचणार आहे. त्यापूर्वी वारकरी विसव्याला बसुन देवाचे भजन करत फुगडी खेळत उत्सहात जेजुरी नागरिकडे निघाले आहेत.

  • 24 Jun 2025 01:40 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात आठवडाभरानंतर मोठी घसरण झाली आहे. सोन्या दरात तब्बल 1600 रूपयांनी तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 219 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार 180 रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 24 Jun 2025 01:25 PM (IST)

    नागरिकांची गोदाकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी

    पावसाच्या विश्रांतीनंतर नागरिकांची गोदाकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी. सकाळपासून पावसाची नाशिकमध्ये विश्रांती. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ. गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.

  • 24 Jun 2025 01:15 PM (IST)

    प्रभाग रचनेवरुन प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप

    प्रभाग रचनेचे आयुक्तांचे अधिकार काढून राज्य सरकारकडे घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी जो काल आदेश काढला आहे, त्याला आता बळकटी मिळाली आहे. पुणे शहरात हवी तशी प्रभाग रचना भाजपचे आमदार करून घेत आहेत. तीच प्रभागं रचना अंतिम होईल. प्रशांत जगताप यांचा भाजपवर आरोप. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना डावलून प्रभाग रचना केली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांचा आरोप.

  • 24 Jun 2025 12:52 PM (IST)

    गुजरात उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

    गुजरात उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. अहमदाबाद पोलिसांकडून गुजरात उच्च न्यायलयात तपासणी सुरू आहे.

  • 24 Jun 2025 12:47 PM (IST)

    सोलापुरात दुचाकी आणि डंपर मध्ये भीषण अपघात, 3 ठार

    सोलापुरात बिगारी कामगारांच्या दुचाकीला डंपरची धडक लागल्याने अपघातात 3 जण जागीच ठार झालेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री ते मुस्ती गावादरम्यानच्या रस्त्यावर विचित्र अपघात घडला.

    अनोळखी डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे

  • 24 Jun 2025 12:33 PM (IST)

    शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा प्रखर विरोध

    शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे.

    धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी येथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं.  शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना समोर घोषणाबाजी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे.

    मोजणी करण्यात येणाऱ्या मार्गावरती शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.  तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

  • 24 Jun 2025 12:16 PM (IST)

    राहुल गांधी आणि काँग्रेसची वैफल्यग्रस्तता यातून दिसून येते – प्रसाद लाड यांची टीका

    राहुल गांधी आणि काँग्रेसची वैफल्यग्रस्तता यातून दिसून येते . सतत पराभव झाल्यानंतर सरकार येत नाही, आलेलं सरकार टिकवता येत नाही, जनतेचे प्रश्न मांडता येत नाही, संघटना मजबूत करता येत नाही. सपशेल फेल झाले म्हणून ज्यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडलं , त्यांनी भाजपासारख्या पक्षावर बोलणं , हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे – अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

  • 24 Jun 2025 12:07 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यांत 8 टक्के मतदार वाढले – राहुल गांधी यांचा आरोप

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मतदारसंघात 5 महिन्यांत 8 टक्के मतदार वाढले, ट्विट करत राहुल गांधी यांचा मोठा आरोप. निवडणूक आयोग गप्प का आहे, असा सवालही राहुल गांधींनी विचारला आहे.

     

  • 24 Jun 2025 11:55 AM (IST)

    जळगावात राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची एकमेकांवर धडक

    जळगावात राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची एकमेकांवर धडक… स्वामी नारायण मंदिराजवळ अपघात, एकाचा जागीच मृत्यू…

  • 24 Jun 2025 11:40 AM (IST)

    मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू

    कल्याण वरून सीएमएमटीकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहेत… स्टेशन परिसरात इंडिकेटर बंद असल्याने लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे…

  • 24 Jun 2025 11:30 AM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार…

    विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यानं महादेव बाबर नाजार होते… पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का… ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार….

  • 24 Jun 2025 11:20 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री विठ्ठल दर्शनासाठी उद्या पंढरपुरात येण्याची शक्यता

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेची तयारी आणि श्री विठ्ठल दर्शनासाठी उद्या पंढरपुरात येण्याची शक्यता… गेल्या वर्षी आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी करण्याकरता देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आले होते… आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पंढरपुरात चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशी पूर्वी म्हणजेच उद्या पंढरपुरात येणार असल्याची माहिती… आषाढी यात्रेसाठी सुरू असलेल्या विविध विभागाच्या तयारीचाही ते घेणार आहेत आढावा…

  • 24 Jun 2025 11:02 AM (IST)

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

    बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची डोभाल यांनी घेतली भेट… दोन्ही देशांमध्ये अलिकडील काळात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला… सोबतच भारत-चीन संबंधांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याची माहिती

  • 24 Jun 2025 10:59 AM (IST)

    माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार

    शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. पुण्याच्या विकासाचा मुद्दा हेच आपल्या पक्षांतराचे प्रमुख कारण असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले. दुपारी ४ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. गेली तीस वर्षे मला शिवसेनेत खूप प्रेम मिळाले. तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केले. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास वेगाने होत असल्याने विकासाच्या मुद्द्यावरून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 24 Jun 2025 10:46 AM (IST)

    “ज्या गावातून कमी मताधिक्य मिळेल, त्या गावांना…” बबनराव लोणीकर यांचा मतदारांना थेट इशारा

    भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्याच मतदारांना थेट इशारा दिला आहे. ज्या गावांतून त्यांना मताधिक्य कमी मिळेल, त्या गावांना ५-१० कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी एक-दोन-तीन वेळा पाहिल्यानंतर त्या गावांवर फुली मारेन,” अशा शब्दांत लोणीकर यांनी गावकऱ्यांना आपल्या भाषणातून धमकीवजा इशारा दिला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

  • 24 Jun 2025 10:30 AM (IST)

    हिंदी भाषेच्या सक्तीवरुन मनसे पुन्हा आक्रमक, कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक

    राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज सकाळी १०.३० वाजता दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल अशी शक्यता आहे.

  • 24 Jun 2025 09:51 AM (IST)

    मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडली

    मुंबईत रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाड पडली आहेत. मुंबईच्या अंधेरी, विलेपार्ले, जुहू आणि सांताक्रुज सहित वांद्रे कलानगर परिसरामध्ये झाड्यांच्या फांद्या पडल्या आहेत.

  • 24 Jun 2025 09:42 AM (IST)

    मानपाडा ते माजीवाडा मार्गावर वाहतूक कोंडी

    ठाण्याहून मुंबई- नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मानपाडा ते माजीवाडा मार्गावर गाडी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक शाखेकडून बंद पडलेल्या गाडीला बाजूला करण्याचं काम सुरू आहे. सध्या वाहतूक धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे.

  • 24 Jun 2025 09:22 AM (IST)

    माळेगाव कारखान्याच्या मतदान मतमोजणी सुरुवात

    माळेगाव कारखान्याच्या मतदान मतमोजणी सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. मतमोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 24 Jun 2025 09:09 AM (IST)

    टोमॅटोची उच्चांकी आवक

    जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो बाजारात सोमवारी 21 हजार टोमॅटो क्रेडची उच्चांकी आवक झाली. व्यापाऱ्यांनी प्रतवारीनुसार टोमॅटोला पाच ते पंधरा रुपये प्रति किलो असा बाजारभाव दिला.

  • 24 Jun 2025 09:00 AM (IST)

    नाशिकला आज पावसाचा यलो अलर्ट

    नाशिकला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून गंगापूर धरणातून 6000 क्यूसेकपेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.

  • 24 Jun 2025 09:00 AM (IST)

    जळगावात राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक

    जळगावात राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून दुसऱ्या चालकाला देखील दुखापत झाली आहे.  ही धडक इतकी जोरदार होती की यात दोन्ही ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  • 24 Jun 2025 08:53 AM (IST)

    नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम

    नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलं आहे. रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेला. तर गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे. अनेक लहान मंदिरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.

  • 24 Jun 2025 08:52 AM (IST)

    ठाण्याहून मुंबई – नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मानपाडा ते माजीवाडा मार्गावर वाहतूक कोंडी

    ठाण्याहून मुंबई – नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मानपाडा ते माजीवाडा मार्गावर गाडी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाकडून बंद पडलेल्या गाडीला बाजूला करण्याचं काम सुरू आहे. सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

  • 24 Jun 2025 08:51 AM (IST)

    जलजीवन मिशन योजनेला जळगाव जिल्ह्यात मक्तेदारांच्या दिरंगाईमुळे मोठा आर्थिक फटका

    जलजीवन मिशन योजनेला जळगाव जिल्ह्यात मक्तेदारांच्या दिरंगाईमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. वेळेत कामे सुरू न करणाऱ्या ३८ पाणी योजनांच्या कामांसाठी काढलेल्या फेरनिविदांमुळे या प्रकल्पांचा खर्च तब्बल १५ कोटीवरून ३० कोटींवर पोहोचला आहे. मक्तेदारांनी कामे घेऊनही वेळेत सुरुवात न केल्याचा हा थेट परिणाम असून, कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त बोजा आता शासनावर पडणार आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत १,३००हून अधिक पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. यापैकी ३३४ योजना पूर्ण झाल्या, तर काही महावितरणच्या जोडणीअभावी रखडल्या आहेत.

  • 24 Jun 2025 08:50 AM (IST)

    फार्मर आयडी नसेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार नाही

    फार्मर आयडी नसेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार नाही, अर्ज देखील नाकारला जाणार अशी माहिती कृषी विभागाने दिली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावे, असं आवाहन महसूल आणि कृषी विभागाने केलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 62.47 टक्के शेतकऱ्यांचीच अँग्री स्टॅक पोर्टलवर नोंदणी झाली आहे. कृषी विभागातील शासकीय योजनेसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक असेल.