AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टीव्ही 9’ च्या प्रतिनिधीचं ‘अवनी’ वाघिणीसाठी भावनिक पत्र

वर्षभरापूर्वी यवतमाळ येथे एका नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. अवनी वाघिणील्या मारल्याप्रकरणी समाजातूनही सरकारवर टीका (emotional letter for avani tiger) केली जात होती.

'टीव्ही 9' च्या प्रतिनिधीचं 'अवनी' वाघिणीसाठी भावनिक पत्र
| Edited By: | Updated on: Nov 03, 2019 | 3:10 PM
Share

यवतमाळ : वर्षभरापूर्वी यवतमाळ येथे एका नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. अवनी वाघिणीला मारल्याप्रकरणी सर्वच स्तरातून सरकारवर टीका (emotional letter for avani tiger) करण्यात आली होती. तसेच प्राणी मित्र यांनीही रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात निदर्शने केली होती. याच संपूर्ण घटनेवर टीव्ही 9 चे यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांनी अवनी वाघिणीसाठी भावनिक असं पत्र (emotional letter for avani tiger) लिहिलं आहे.

‘मारणं’ अन् ‘मरणा’ची ‘ ब्रेकिंग’ होते तेंव्हा….

स्वर्गीय प्रिय अवनी, सप्रेम नमस्कार!…

माझ्या पत्राची सुरुवातच मी ‘प्रिय’ या शब्दानं केली आहे. खरं सांगू का अवनी!… मेलेल्यांबद्दल कधीच वाईट बोलू नये हा संस्कार अगदी लहानपणापासूनच मनात घट्ट बिंबलेला. त्यामूळेच याच संस्कारातून तू माझ्यासाठी आजही ‘प्रिय’ आहेस. परंतु, तू ठार केलेल्या तेरा लोकांच्या कुटूंबियांसाठी तू कायमचीच ‘व्हिलन’ असणार आहेस. अवनी!, आज तुला जाऊन वर्ष पूर्ण होत आहे. तुला मारल्यानंतर ‘गरम’ झालेलं वातावरणही आता अगदी पार निवळलंय. वन्यप्रेमी, ‘ट्वीट’चा ‘टिवटीवाट’ करणारेही कदाचित तुला आता विसरले असतील. तुझ्या मृत्यूनंतर उगवलेले काही तथाकथित प्रसिद्धीपिसाट ‘प्रेमी’ही हल्ली दिसत नाहीत. परंतु, मी ‘पत्रकार’ अन् ‘माणूस’ म्हणून तुला कधीच विसरु शकणार नाही.

अवनी!, अगदी लहान असतांना आई अगदी सहज भिती दाखवायची, “पप्पू!, झोप लवकर.. नाही तर वाघ येईल”…. मात्र, बालपणात ऐकलेला वाघ, त्याची दहशत, त्याच्या कोपातून उघडी पडलेली कुटूंब अन् हो त्यावरचं राजकारण याचं ‘लाईव्ह’ चित्रं तुझ्यामूळे स्वत: पाहता अन् अनुभवता आलं.

अवनी!, अगं तुझी ‘वाघा’ची जातच कायम आपला दरारा कायम ठेवणारी. त्यातही तू ‘बाई’ होतीस, अन् तुझ्या दोन बछड्यांची आईसुद्धा… बाई कितीही करारी असली तरी ती ‘क्रूर’ नसते असं अनेकदा ऐकलेलं अन् वाचलेलं. परंतु, एक वाघीण किती ‘क्रूर’ असू शकते याचं ‘उदाहरण’ तू ठरलीस. रोज तू माणसांच्या रक्ताला चटावलीस. यात तू तेरा निष्पापांना कायमचं संपवलंस. तुझ्या याच रक्ताच्या चटावलेपणानं तुझा घात केला. अन् बरोबर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी तुझा ‘खात्मा’ करण्यात आला, तुला मारण्यात आलं. या वर्षभराच्या काळात पत्रकार म्हणून मला अनेकदा तुझी आठवण आली.

अवनी!, तुझं रिपोर्टिंग माझ्या आयुष्यातला अतिशय धावपळीचा अन आव्हानात्मक काळ… तुझ्या रिपोर्टिंगच्या त्या 53 दिवसांत तर अनेकदा आठवडा-आठवडाभर बाहेर जंगलात रहावं लागलं. अनेकदा ‘रेंज’ही नसायची. याच काळात माझ्या सहा महिन्याच्या मूलीपासून मी दूर होतो. तिचं लाड, कौतूक, आजारपणं करतांना घरच्यांनीही मला या काळात खूप समजून घेतलं. परंतु, मला या काळात तुझ्यासाठी बाहेर असल्यानं अन् लेकरापासून दूर रहावं लागत असल्यानं स्वत:चाही राग यायचा. ज्या तेरा लोकांना तू मारलंस त्यांच्या कुटूंबियांचा आक्रोश पाहिला की, तुझ्या मरणाविषयीच्या भावना आणखी तीव्र व्हायच्यात.

अवनी!, मला तो दिवस अन् ती रात्र आजही लख्ख आठवते. 2 नोव्हेंबर 2018 ला शुक्रवार होता. मला रात्री ‘एक’ फोन आला की, अवनीचा ‘खात्मा’ झाला. मी लगेच तोंडावर पाणी मारलं अन् गाडी काढत बोराटीचं जंगल गाठलं. तिथे पोहोचणारा पहिला पत्रकार मीच होतो. तेरा कुटूंब उद्ध्वस्त करणारी ‘वाघीण’ आता मात्र कायमचीच ‘शांत’ झाली होती. तुझा निष्प्राण देह ओरडून सांगत होता की रक्त अन् पैशाची चटक कुणालाही संपवू शकते. त्यावेळी तुझ्या मरणाविषयीच्या माझ्या भावना शब्दांच्या पलिकडे होत्या. तशाच त्या आनंद अन् दु:खाचं अनोखं मिश्रणही होत्या.

अवनी!, तू या काळात कित्येकवेळा मला ‘ब्रेकिंग’ दिल्यात अन ‘एक्सक्लूझिव्ह’ही…. तुझ्या रिपोर्टिंगमध्ये तब्बल 53 दिवस घालवलीत मी… माझ्या टीव्ही पत्रकारितेतील ‘ब्रेकिंग’च्या विश्वात अनेक बातम्या, विषय येतात अन् जातातही… तू, तुझ्याबद्दलची प्रत्येक रिपोर्टिंग, तुला पकडण्यासाठीची ‘ती’ मोहीम… अन् शेवटी तुझं राळेगाव तालूक्यातला बोराटीच्या जंगलातलं तुझं मरण… मला पत्रकार म्हणून तुझा ‘अध्याय’ समृद्ध करुन गेला असेलही. मात्र, माणूस म्हणून तू मला कायमचं अस्वस्थ करून गेलीस. या अस्वस्थपणाच्या तळाशी अनेक संदर्भ आहेत, अनेक प्रश्न अन् कारणंही… त्याबद्दल कधीतरी बोलणं होईलच. परंतु, आयुष्यात कुणी मेल्यानंतर पेढे वाटल्या गेलेत हे पहिल्यांदाच पाहिलं… अर्थातच, याला जबाबदार तू की आम्ही ‘माणसं’ यावरची चर्चाही कधीच न सरणारी असेल.

अवनी!, आज तुला वर्ष पूर्ण झालं. तुझे बछडेही आता सरावलेत. जंगलातली दहशतही संपली. तुझ्या निमित्तानं यवतमाळ कायम राज्यात, देशात अन् जगातही ‘हेडलाईन’मध्ये होतं. यावर सर्वच माध्यमांमध्ये चर्चा झडल्यात, वाद झालेत. दोन्ही बाजूनं वाद-प्रतिवाद झालेत. हे सारं पुढेही सुरुच राहील. परंतु अवनी!, जगातील कोणत्याच पत्रकाराच्या नशिबी अशा एखाद्या अवनीची ब्रेकिंग करायची वेळ येऊ नये. यासाठी तू आमच्या रक्ताला का चटावलीस?, याचं आत्मचिंतन समाज, सरकार अन् पर्यावरणप्रेमींनी करावं. तरच यानंतर कदाचित उत्क्रांतीवादाच्या साखळीतील ‘सर्व्हाव्हल फाँर फिटेस्ट’साठी कोणत्या अवनीला मारावं लागणार नाही. तुला विनम्र श्रद्धांजली, अवनी!…. शक्य झालं तर आम्हाला माफ करशील…

तुझाच अपराधी, विवेक गावंडे, रिपोर्टर, टीव्ही 9, यवतमाळ.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.