
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ पुण्यात पार पाडला, या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यावर आता राजकीय वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून जय गुजरात घोषणेवरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सामतं?
फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. हा पक्षाचा किंवा सरकारी कार्यक्रम होता का? हा गुजराथी समाजाचा कार्यक्रम होता. ते जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणाले. मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. तिथे भाषण संपवताना शरद पवार साहेब जय कर्नाटक बोलले होते. काही लोक फेक नरेटिव्ह पसरवतात, पण त्याचा काही परिणाम होत नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दाओसला जावून 15 लाख 74 कोटींचे MOU केले
-या MOU ची अंमलबजावणी झाली पाहिजे, सुलभ परवानगी मिळाली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले होते. 21 प्रकल्पांना आम्ही जागा दिल्या आहेत. 7 प्रकल्पांना लवकरच जागा देऊ, 46 MOU केले आहेत. आपले राज्य पहिले असे राज्य आहे, जिथे दर दोन महिन्यांनी पाठपुरावा व्हावा या करता टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. 31 जणांची कमिटी आज आम्ही तयार केली आहे, आता दर दोन महिन्यांनी बैठक होईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचाही टोला
‘अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.