पुणे शिक्षक उमेदवारीवरून शिवसेनेतच मोठी रस्सीखेच, सानप की चिवटे? उदय सामंतांच्या हालचाली, शिंदेंची भेट…
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्येच आता मोठी रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आता थोड्यावेळापूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेतही दोन दावेदार समोर आले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन सानप आणि एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. मात्र, शिंदे नंदनवन येथे नसल्याने ही भेट होऊ शकली नाही आणि सामंत तेथून निघून गेले. सानप यांच्या नावाला पुण्यातील स्थानिक भाजप आणि भाजप समर्थकांकडून समर्थन असल्याचा दावा केला जात आहे.
तसेच पुण्यातील एका स्थानिक सर्वेक्षणात सानप यांना उमेदवारी मिळाल्यास महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा सर्वेक्षणाचा दावा स्वतंत्रपणे पडताळलेला नाही. दरम्यान, मंगेश चिवटे यांनीही उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली असून, 3 ऑक्टोबरला त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता जर फक्त तीन दिवसांचा वेळ शिल्लक असल्याने नेमकं काय घडणार याकडे लक्ष लागलं आहे.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम?
२९ सप्टेंबर रोजीच अधिसूचना जाहीर झालेली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर
अर्जाची छाननी : ७ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर
मतदान : २३ ऑक्टोबर, सकाळी ८ ते दुपारी ४
मतमोजणी : २७ ऑक्टोबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी
तर मतदार संख्येबद्दल बोलायचे झाल्यास जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार होते. त्यानंतर झालेली मतदार नोंदणी तसेच २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या नोंदणीमुळे अंतिम मतदारसंख्येत बदल होणे अपेक्षित आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून घेतली जाते. त्याबाबत निवडणूक प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.