ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचीच होती; उद्धव ठाकरे यांचं ते पत्र वाचून दाखवत मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सोबतच त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचीच होती; उद्धव ठाकरे यांचं ते पत्र वाचून दाखवत मोठा गौप्यस्फोट
uddhav thackeray and devendra fadnavis
Updated on: Oct 01, 2025 | 5:19 PM

Uddhav Thackeray : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक अतिवृष्टीत वाहून गेले आहे. काही लोकांच्या घरातील संसाराचे सामान वाहून गेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिके तर पूर्णपणे हातातून गेली आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मागण्या केल्या आहेत. दरम्यान, आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन  देवेंद्र फडणीस यांनी विरोधी पक्षनेते असताना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे. या पत्रात फडणवीस यांनी राज्य सरकारला तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता याच पत्राचा दाखला देत ठाकरे यांनीदेखील सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली आहे.

मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत भाष्य केले. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या. “गेल्या आठवड्यात मी राज्यात पाहणी केली. लोकांना भेटलो. त्यानंतर तुमच्याशी बोललो. सरकारला विनंती केली की राजकारण न करता मार्ग काढावं. पण सरकारची तशी तयारी आहे हे वाटत नाही. मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री पाकिटावर फोटो छापण्यात मग्न आहेत. जनता वाऱ्यावर आहे,” असी टीका ठाकरे यांनी केली.

बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं, तेव्हाच…

तसेच, आज बातमी आली. शेतकऱ्यांवर सरकारचा पूरभार. काही साखर सम्राट भाजपमध्ये गेले आणि शेकडो करोडोंच्या कर्जावर त्यांनी थकहमी मिळवली. आम्ही गरिबांसाठी मागणी करत आहोत. ज्या शेतकऱ्यांना जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. त्याशिवाय कर्ज मिळत नाही, अशी हकिकत सांगून ठाकरेंनी फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहे का?

पुढे बोलताना, आज त्यांचं पीक उद् ध्वस्त झालं आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या येत आहेत. साखर सम्राट भाजपमध्ये गेल्यास त्याच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल तर साध्या शेतकऱ्यांनी भाजपमध्ये येण्याची वाट भाजप पाहत आहे का. शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहे का? असा सवालही त्यांनी केला.

फडणवीसांचं पत्र वाचून दाखवलं

दरम्यान, ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशीही मागणी त्यांनी केली. सोबतच विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी वाचून दाखवले. फडणवीसांनी तेव्हा सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.  हे पत्र जसंच्या तसं वाचून दाखवून ठाकरे यांनी फडणवीस यांनी आता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी केली.