
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे, मात्र शासनानं जाहीर केलेलं हे पॅकेज अत्यंत कमी आणि फसवं असल्याची टीका आता विरोधकांकडून सुरू झाली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा पार पडला, या मोर्चानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शेतकऱ्यांना पैसे का दिले जात नाहीत, पैशांची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून पैसे आणा, जुन्या पैशांची बेरीज करून हा आकडा तयार केला आहे, हे फसवं पॅकेज आहे. आम्ही त्यावेळी एनडीआरएफच्या निकषाच्यावर पॅकेज दिलं होतं, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून देखील त्यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
शहरभर त्यांनी होर्डिंग्ज लावली. बीकेसीत ब्रिटनचे पंतप्रधान आले होते. प्रचंड जाहिरात केली. मुंबई बरबटून टाकली. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे गटात प्रवेश केला की काय? असे पोस्टर्स लावले. जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करता. शेतकऱ्यांना का देत नाही हे पैसे. पॅकेज दिलं म्हणून त्यांचेच आमदार स्तुती करत आहेत. शेतकरी का करत नाहीत स्तुती असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, असं वक्तव्य मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं होतं, या वक्तव्याचा देखील उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाद हा शब्द तुमच्याबद्दल आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचं नुकसान खूप झालं आहे. अशा मंत्र्यांचं मानसिक संतुलन तपासलं पाहिजे. यांचे अनेक नाद आहेत. डान्सबारचा नाद आहे. एक एक येत आहेत बाहेर, असा हल्लाबोल देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.