Uddhav Thackeray Interview : ‘त्यांनी पंतप्रधान म्हणून मणिपूरमध्ये जावं’, विमानाच्या उड्डाणाला परवानगी नाकारल्यानं ठाकरेंचा संताप
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रसारीत झाली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रसारीत झाली आहे. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर विशेषत: भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांची निवडणूक प्रचारादरम्यान सोमवारी वणीमध्ये तर आज पुन्हा ऐकदा औसा येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगेची तपासणी करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्यानं लातूरमधून उद्धव ठाकरे यांच्या विमानाच्या उड्डाणाला देखील परवानगी देण्यात आली नाही, यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
गेल्यावेळी लोकसभेला मोदींची पुण्यात सभा होती. तेव्हा तीथे लष्कराच्या छावणीचं रुप आलं होतं. हा खर्च कोण करतो. कुठून होतो? मला जायचं तिथे मोदी येणार म्हणून एअरपोर्ट बंद केलं. म्हणजे आम्ही प्रचार करायचा नाही का? ते मात्र प्रचार करणार. आज मला सोलापूरला जायचं तर मोदी येणार म्हणून एअरपोर्ट बंद. त्यांची जशी सभा तशी माझी सभा. त्यांच्या विमानावर सेक्युरिटीवर खर्च एवढा खर्च का केला जातो. मोदींनी प्रचार करता कामा नये, पंतप्रधान म्हणून प्रचारात उतरू नये. त्यांनी पंतप्रधान म्हणून मणिपूरमध्ये जावं. तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे आहात असा खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज उद्या बॅगा बघा. आमच्या बॅगेत मारी बिस्कीट आणि खारी बिस्कीट असतात. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून अधिक बॅगा येतात. आमची एखादी बॅग होती. मोदींची ओडिशात बॅग तपासणी केली, त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं. सर्वांच्या बॅगा तपासा. माझ्या रोज बॅगा तपासा, माझ्या बॅगा त्यांनी कॅरी कराव्यात, त्यामुळे माझं ओझं कमी होईल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.