
मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. हिंदी सक्तीला विरोध म्हणून दोघांनीही मोर्चा काढायचं ठरवलं आणि सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर या दोघांनी विजयी रॅलीचं आयोजन केलं. दोघही 20 वर्षानंतर एका मंचावर आले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दोघांची राजकीय युती होणार का? अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनातील मॅरेथॉन मुलाखतीत भाष्य केलं आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आम्ही (राज आणि मी) एकत्र आलो. प्रॉब्लेम कुणाला आहे? ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांचं ते बघतील. आपण कशाला विचार करायचा? आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांनाही, अगदी मुसलमानांनाही आनंद झाला आहे. मुसमानही जाहीरपणे बोलले आहे, हिंदी आणि गुजराती भाषिक सुद्धा मला म्हणाले की, अच्छा किया अपने. त्यांना झालेला आनंद मी पाहतो. कुणाचा पोटशूळ उठला असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी आनंदाकडे पाहतो. मी पॉझिटिव्ह बाजू बघतो. देशभरात विजयी मेळावा गाजला. म्हणून महाराष्ट्र किंवा इतर भाषिक असं झालं नाही. इतर भाषिकांनाही आनंद झाला. मुंबईतील अमराठीही आहे, त्यांनीही सांगितलं की असं हे लढलं पाहिजे, असं सांगतानाच याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते साकार करू. मराठी माणसाने मराठी मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं, अशी लोकांची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर, 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं काही नाही, पण मी जे म्हटलं मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी जे जे करण्याची गरज आहे, ते ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात माझी राज ठाकरेंशी चर्चा होईल, असं सांगतानाच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 20 वर्षाने एकत्र आलो, हेही नसे थोडके. हेही खूप मोठं आहे. त्यामुळे मी भाषणात म्हटलं आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
युतीसाठी राज ठाकरेंशी थेट बोलणार का? असा सवाल करताच उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं. मी राजशी थेट चर्चा केली तर अडचण कुणाला? मी आता फोन करू शकतो. तो मला करू शकतो. आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय? बाकीचे लोकं चोरून मारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणारे नाही. मघाशी तुम्ही मुलाखतीच्या वेळी म्हणालात, ठाकरे ब्रँड आहे. चोरूनमारून करत नाही. भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कुणाला? आणि आम्हाला तरी? असंही ते म्हणाले.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर हल्ला केला. महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य पेटवण्याचं काम भाजप करत आहे. पण इतर राज्य पेटत नाही. आम्ही आमची भाषा लादत नाही. तुम्ही आमच्यावर कोणतीही भाषा लादू नका. आम्ही त्या त्या भाषेचा मान राखतो. तिचा मान आणि अस्मिता असली पाहिजे. पण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा हिंदू म्हणून एक असतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.