
पहलगाममधील नृशंस हल्ल्यानंतर भारातने दहशतवादाविरोधात दंड थोपटले आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी अड्यांवर हल्ले करत 100 हून अधिक दहशतवादी ठार मारले. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला वेळोवेळी खडेबोल सुनावले. मात्र आता आशिया कप 2025मध्ये त्याच पाकिस्तामधील क्रिकेट संघाविरुद्ध उद्या भारताचा सामना होणार आहे. यामुळे देशातील वातावरण पेटलं असून राज्यातही विरोधकांनी यावर कडक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटानेही भारत-पाक सामन्यावरून नाराजी दर्शवली असून आज पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना खडेबोल सुनावले आहेत.
आपले नागरिक हिंदू म्हणून गोळ्या घातल्या हे सत्य आहे तर भाजपच्या लेखी आणि पंतप्रधानाच्या लेखी देशाची काही किंमत आहे की नाही. की देशापेक्षा त्यांना व्यापार मोठा वाटतो ?, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. पंतप्रधानांना जगभरात शिष्टमंडळ पाठवून जे जमलं नाही ते एका सामन्यावर बहिष्कार टाकून जगाला दाखवू शकलो असतो असंही उद्धव यांनी सुनावलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी जगभरात शिष्टमंडळ पाठवले होते. आता मोदींचं काय म्हणणं आहे.ही देशभक्तीची थट्टा आहे. देशभक्तीचा व्यापार सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तुम्ही जे करता ते गपगुमान मान्य करायचं. तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं. तुम्ही पाकिस्तानला मिठ्या मारायच्या. जवान तिकडे लढणार, शहीद होणार. आपले नागरिक हिंदू म्हणून गोळ्या घातल्या हे सत्य आहे तर भाजपच्या लेखी आणि पंतप्रधानाच्या लेखी देशाची काही किंमत आहे की नाही. की देशापेक्षा त्यांना व्यापार मोठा वाटतो असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
एकीकडे मोदी म्हणतात की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही , मग आता त्याचं काय करायचं ? क्रिकेट नाही झालं तर जागतिक संकट ओढवणार नाही असा टोला उद्धव यांनी लगावला. अजून एक संधी आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात जे शिष्टमंडळ गेलं, त्याचा दाखलाही उद्धव यांनी बोलताना दिला. पंतप्रधानांना जगभरात शिष्टमंडळ पाठवून जे जमलं नाही ते एका सामन्यावर बहिष्कार टाकून जगाला दाखवू शकलो असतो. आतंकवादाच्या विरोधात आहोत. पाकिस्तान आमच्या देशात दहशतवाद पसरवत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाक बरोबर ठेवणार नाही. हीच भूमिका शिवसेना प्रमुखांची होती असं उद्धव ठाकेर म्हणाले.
हा फालतूपणा बंद कर
जावेद मियाँदाद इकडे आला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तोंडावर सांगितलं होतं की हा फालतूपणा बंद कर. जोपर्यंत पाकिस्तान नीट वागत नाही तोपर्यंत माझ्या देशात क्रिकेट होऊ देणार नाही अशी आठवणही उद्धव यांनी सांगितली. . मला खरोखर आज सुषमा स्वराज यांची आठवण येते. त्या परराष्ट्र मंत्री होत्या. आता जयशंकर आहे. फक्त नावातच शंकर आहे. कसला जय आणि कसला शंकर, अशी टीका करत उद्धव यांनी भारत-पाक सामन्याचा कडाडून विरोध केला.