
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडत भाजपाशी हातमिळवणी करत महायुतीचे सरकार स्थापन केले. शिवसेना आणि ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला. शिंदे फक्त बाहेर पडले नाहीत तर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही दावा सांगितला. या प्रकरणाची आजही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदेंच्या या कृतीमुळे ठाकरे गट त्यांना सातत्याने गद्दार आणि मिंधे म्हणत डिवचत असतो. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी या सर्व मुद्यांवर प्रतिक्रिया देत शिदे गटावरटर टीका केलीच पण निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडलं. धोंड्या म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर कडाडून हल्ला चढवला.
तसंच ठाकरे म्हणजे संघर्ष हे समीकरण आहे. सर्व काही चोराल तुम्ही, पण ‘ठाकरे’ हे नाव कसं चोरणार? नाव तर कोणी चोरू शकत नाही. चिन्ह किंवा आणखी काही चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार? असा सवालही उद्धव यांनी विचारला.
ज्यांनी ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ज्यांनी माझीच शिवसेना खरी आणि माझंच चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला, निवडणूक आयोगाच्या किंवा दिल्लीतल्या त्यांच्या मालकांच्या माध्यमातून. ते स्वतःची डय़ुप्लिकेट शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये विलीन करायला निघाले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी रोखठोक शब्दांत उत्तर दिलं.” त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे केलं त्याचं वर्णन तुम्हीच माध्यमांसमोर अलीकडेच केलंय. दिल्लीत जाऊन किती पाय धुवायचे आणि चाटायचे? त्यातून सगळं चित्रच डोळ्यांसमोर उभं राहिलं. असे जे लोक असतात ते परावलंबीच असतात.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचं अस्तित्व संपवू शकत नाहीत
अमित शहा व निवडणूक आयोगाने जी शिवसेना दुसऱयांच्या हातात दिलीय, ती अशा प्रकारे भाजपमध्ये कशी विलीन करू शकतात? शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न आहे का? अस राऊत यांनी विचारलं असता, शिवसेना कोणीही संपवू शकत नाहीत. इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. त्यामुळे ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करायचं आणि मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढं आहे असं उद्धव म्हणाले.
निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱयाला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱयाला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? असा सवाल विचारात या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही असं उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितलं.
लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे. नाव दुसऱयाला देऊ शकत नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तरी चोर तो चोरच…
‘शिवसेना’ हे नाव त्याला दुसऱयाला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय. लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच असंही उद्धव यांनी सुनावलं.