
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवाता झाली आहे. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार निशाणा साधला. बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकवलं, आणि जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी आपण गुलामगिरीमध्ये राहत होतो, तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशिबी येईल. मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून मी आयुष्य जगणार नाही, अशी शपथ सर्वांनी घेतली पाहिजे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव न घेता केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
हे अचानक काही जे चाललं आहे ना, जंगलाच्या जाग्यावर विकास, खाण. जसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर येतो आणि कुऱ्हाडीने त्याच्या मुळावर घाव घायला लागतो, कारण ते झाड मध्ये येत असतं. जोपर्यंत ते झाड आहे, तोपर्यंत त्याची खाण नाही होऊ शकत, आणि तो जेव्हा त्या झाडवर घाव घालायला लागतो, तेव्हा त्या झाडावरील पशू पक्षी थरारून उठतात आता आपलं काय होणार? आपलं काय होणार? मग त्यातील काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात, की अरे दादा तुला खूप वाईट वाटत असेल ना? तुला खूप वेदना होत असतील ना? तेव्हा ते झाडं म्हणतं यातना होत आहेत, जे घाव बसत आहेत, त्या यातना वेगळ्या आहेत. पण हा जो ठेकेदार आला आहे, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्यावर घाव घालत आहे, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडापासून बनला आहे. त्याचं जास्त दु:ख होत आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, हे असे सर्व कुऱ्हाडीचे दांडे हे दोन व्यापारी आपल्याच मुळावर घाव घालण्यासाठी वापरत आहेत. त्याचा आपल्याला राग येतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सर्वजण अलर्ट आहात. देशभरातून मला मेसेज येत आहेत, की ही लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात, एक आभास निर्माण केला गेला होता की आता बस शिवसेना संपली, पण ज्यांनी आभास निर्माण केला त्यांना तुम्ही रोखलं. हे फक्त महाराष्ट्रच करू शकतो. दोन व्यापाऱ्यांकडून आपल्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे, मग तुम्ही हा विचार करा की ठाकरे हे झाड यांना का तोडायचं आहे? तर तोपर्यंत तिथे यांची खाण होणार नाहीये.
बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकवलं, आणि जर जगायंच कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी आपण गुलामगिरीमध्ये राहत होतो, तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशिबी येईल. मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून मी आयुष्य जगणार नाही, याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे, किती कराल वार, आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.