दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एका मंचावर, संजय राऊत म्हणाले भविष्यात…
गेल्या काही दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध सुधारले आहेत. दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना आमंत्रित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सचिन अहिर यांनी याबाबत संकेत दिला असताना, संजय राऊत यांनी दोन्ही पक्ष वेगळे असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमध्ये चांगलीच एकजूट जमली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी अनेकदा विविध कामानिमित्त एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता येत्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु झाली आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे राज ठाकरेंना आमंत्रित करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी दसरा मेळाव्याबद्दल एक विधान केले आहे. येत्या दसरा मेळाव्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल, कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते, असे सचिन अहिर यांनी म्हटले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
आमचीही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “दसरा मेळावा एकत्र होणार की नाही याबद्दल माहिती नाही. मात्र मी खात्रीपूर्वक सांगतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. राज ठाकरेंचा गुढीपाडव्याचा मेळावा वेगळा असतो. आमचीही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसं होणं शक्य नाही. दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात. भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
या सगळ्या चर्चांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध सुधारले आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन काम करण्यासाठी सकारात्मक आहेत. साठ वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले. या दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.
सचिन अहिर काय म्हणाले?
दरम्यान ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एका मुलाखतीत दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले होते. यंदाच्या दसऱ्याला एक चांगली बातमी मिळू शकते. कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं, असे सचिन अहिर यांनी म्हटले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता यावर संजय राऊतांना प्रतिक्रिया दिली.
