एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल, केंद्रातील बड्या नेत्याचे विधान
हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नव्हे तर तर हे उद्धव ठाकरे यांचे ऑपरेशन झाले असल्याची जोरदार टीका या नेत्याने केली आहे. त्यांनी उद्धव यांना एनडीएत परतण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा दावा केला आहे.

हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले आहे आणि एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आमदार-खासदार हे आमच्याकडे येत आहेत, 2019 मध्येच आमच्यासोबत यावं असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितलं होतं. पण ते आले नाहीत, ती त्यांची चूक होती, त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे,असेही आठवले यावेळी म्हणाले. सांगलीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
आदित्य ठाकरेंचं शेवटचं अधिवेशन
सरकारचं नव्हे तर आदित्य ठाकरे यांचे शेवटचं अधिवेशन आहे असाही टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी लगावला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांची शेवटची आमदारकी आहे, वरळी मतदारसंघातून त्यांना आम्हीच निवडून आणले होते, असे देखील मंत्री रामदास आठवले म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी महायुतीचं हे शेवटचं अधिवेशन आहे, अशी टीका केली होती, यावरून मंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरेंना हा टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसेना रक्षा आंदोलन करावे
उद्धव ठाकरे यांनी राम रक्षा महाआरती आंदोलन करण्यापेक्षा, शिवसेना रक्षा आंदोलन केले पाहिजे अशी खिल्ली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडविली आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी अयोध्याला जावे आणि रामाकडे एक ही आमदार फुटू नये असे साकडे घालावे असा खोचक सल्ला देखील मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणात उद्धव ठाकरेंनी उद्या राज्यभरात रामरक्षा महाआरती आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून मंत्री रामदास आठवले यांनी हा टोला लगावला आहे.
