युती गेली खड्ड्यात, उद्धव ठाकरेंचा बीडमध्ये हल्लाबोल

बीड: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला. “युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा. दुष्काळी पथक येऊन गेलं, मात्र अद्याप मदत मिळाली नाही. तसंच कर्जमाफीची प्रमाणपत्रं मिळाली, मात्र कर्जमाफ झालंच नाही. कर्जमाफी नको …

युती गेली खड्ड्यात, उद्धव ठाकरेंचा बीडमध्ये हल्लाबोल

बीड: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला. “युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा. दुष्काळी पथक येऊन गेलं, मात्र अद्याप मदत मिळाली नाही. तसंच कर्जमाफीची प्रमाणपत्रं मिळाली, मात्र कर्जमाफ झालंच नाही. कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, शेतकऱयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले खरे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच आलं नसल्याचं उदाहरण उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये दाखवलं. बीड येथील अंजनडोह या गावातील बाळासाहेब सोळुंके या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलवून, त्याला मिळालेलं प्रमाणपत्र दाखवलं. प्रमाणपत्र जरी मिळालं असलं तरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक रुपयादेखील बाळासाहेब यांच्या खात्यात जमा झालेला नाही, असं उद्धव यांनी सांगितलं.

दरम्यान, बीडच्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी पशुधनाच वाटप केलं. सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज असून, जनावरांना चारा आणि पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नवीन वर्ष सुरू झालं आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.  आतापर्यंत जे भोगलत ते इतिहासात जमा होऊ द्या, अच्छे दिन नाही तर अच्छे वर्ष येऊ द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 अच्छे दिन आणत असताना आपलं कोण आणि थापाडं कोण हे समजलं पाहिजे.  आज रिकाम्या हाताने आलो नाही, पशुधन आणि पाण्याच्या टाक्या आणल्या आहेत.रामदास कदम यांनी शंभर ट्रक पशुधन देण्याची घोषणा केली, मात्र त्याहून अधिक देऊ.  पोकळ घोषणा नकोत. दुष्काळ बघायला पण यांना यंत्रणा लागते, माझी यंत्रणा समोर बसली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मराठवाड्यात पुन्हा येणार आहे. सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगर उठवायला आलोय. दुष्काळ सदृश्य शब्दाचे खेळ नकोत, केंद्राचं पथक येऊन गेलं, मदत मिळली नाही, हे मदत पथक होतं की लेझीम पथक होतं?, असा सवाल उद्धव यांनी विचारला. गाजर नुसतं दाखवतात मात्र ते पण देत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

युती गेली खड्ड्यात माझ्या शेतकऱ्याचं बोला, नुसत्या घोषणा करत आहेत, तुमचे दिवस किती राहिलेत? घोषणांचा बुडबुडा आहे. कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असं उद्धव म्हणाले.

मला काही म्हणा शेतकऱ्यांना काही मिळत नसेल तर मी सत्तेत असूनही विरोधात बोलणार. घोषणांचं सोंग आणि ढोंग आणलं जात आहे. शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, खोटं बोलून एकही मत मला नकोय, सत्तेत आहे पण माणुसकी सोडणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.माणुसकीच्या नात्याने जे करता येईल ते करेन, कर्जमाफीची थोतांड समोर आणलं आहे. तुमच्या वेदनांना वाचा फोडायला आलोय. राफेल बरोबरीचा मोठा घोटाळा पीकविम्यात झाला आहे. गेली साडेचार वर्ष यांना साथ दिली, मात्र ना शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला, ना राम मंदिराचा.

न्यायालय निर्णय घेणार तर जाहीरनाम्यात आम्ही करू असं का सांगितलं? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.मला शेतातलं कळत नाही, मात्र प्रश्न कळतात. पशुधन वाटलं कारण या जनावरांची जबाबदारी आपल्याकडे आहे, आपण गो माता म्हणतो, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या माणसांसाठी आहेत, मात्र जनावरांसाठीही टाक्या देईन. शिवसेनेचा राजकीय दुष्काळ तुम्हाला संपवायचा आहे, एक दुष्काळ मी संपवण्यासाठी मदत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *