एक जागा, दोन उमेदवार अन् दोघांकडे एबी फॉर्म; भाजपची मोठी चूक, आता अधिकृत कोण?

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकाच वॉर्डमध्ये दोन भाजप उमेदवार आहेत. तांत्रिक चुकीमुळे कोमल लहरानींना अपक्ष चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

एक जागा, दोन उमेदवार अन् दोघांकडे एबी फॉर्म; भाजपची मोठी चूक, आता अधिकृत कोण?
BJP ulhasnagar
| Updated on: Jan 05, 2026 | 1:04 PM

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात उल्हासनगरच्या भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पॅनल क्रमांक १९ मध्ये पक्षाने मर्यादेपेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे. या गोंधळामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार कोमल दिनेश लहरानी यांना चक्क अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. तर दुसरीकडे पक्षादेश न मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय?

उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल १९ मध्ये चार जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र भाजपकडून पाच जणांना एबी-फॉर्म देण्यात आले. प्रामुख्याने १९ ब या जागेसाठी कोमल दिनेश लहरानी आणि लक्ष्मी बंटी कुरसेजा या दोघींनीही पक्षाचा बी-फॉर्म जोडला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मते, एबी-फॉर्म वाटपाच्या वेळी तांत्रिक चूक झाली आणि लक्ष्मी कुरसेजा यांना चुकून फॉर्म देण्यात आला. ही चूक लक्षात आल्यावर पक्षाने त्यांना फॉर्म परत करण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश झुगारून तो फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.

या प्रकारामुळे शहरात संभ्रम निर्माण झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी तातडीने भूमिका स्पष्ट केली. कोमल दिनेश लहरानी याच भाजपच्या अधिकृत पुरस्कृत उमेदवार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे कोमल लहरानी यांना भाजपचे कमळ हे अधिकृत चिन्ह मिळू शकले नाही. त्यांना आता क्रिकेट फलंदाज या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजप आपल्या संपूर्ण ताकदीनिशी लहरानी यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे वधारिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पक्षाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून स्वतःला अधिकृत उमेदवार म्हणवणाऱ्या लक्ष्मी बंटी कुरसेजा यांच्यावर भाजपने कठोर कारवाई केली आहे. बंटी कुरसेजा यांना त्यांच्या मंडळ अध्यक्ष या पदावरून तात्काळ हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सिंधू शर्मा यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, लक्ष्मी कुरसेजा यांनी पत्रकार परिषद घेत मीच पक्षाची खरी उमेदवार आहे असा दावा केला आहे, त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.