
राज्यात हिंदीचा मुद्दा तापल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केले. त्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूची उपस्थिती होती. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल वीस वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसंदर्भातील चर्चेला उधाण आलं.
ही चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, राज ठाकरे तब्बल सहा वर्षांनंतर मातोश्रीवर गेले. या सर्व घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराला फोन केला आहे. या फोनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अमित शाह यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांना फोन केला. अमित शाह यांनी आष्टीकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाह यांनी यावेळी आष्टीकर यांच्याशी संवाद साधला. नागेश आष्टीकर हे शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार आहेत, अमित शाह यांनी वाढदिवसानिमित्त आष्टीकर यांना फोन केला, अमित शाह यांच्या फोनची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुम्ही कितवा वाढदिवस साजरा करत आहात? असा सवालही यावेळी अमित शाह यांनी आष्टीकर यांना विचारला. त्यावर मी 54 वा वाढदिवस साजरा करत आहे, असं त्यांनी अमित शाह यांना म्हटलं आहे. या फोनची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सभागृहामध्ये सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं, तिकडे स्कोप नाही, पण इकडे आहे, तुम्ही इकडे येऊ शकता असं फडणवीस यांनी म्हटलं होतं, याची देखील त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती.