Weather Update: वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती, पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी अन् गारपीटचे संकट, महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Weather Update: अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त राज्याच्या दिशेने येत आहे. तसेच गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे.

Maharashtra Weather Today : महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 40 अंशाच्या वर पोहचले आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
मुंबईतील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील सगळ्याच भागांत सोमवारी पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 3 दिवस पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त राज्याच्या दिशेने येत आहे. तसेच गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उष्ण आणि दमट वाऱ्याच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा विदर्भात वारंवार अवकाळी पावसाचे संकट येत आहे. आता पुन्हा नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, गोंदिया या भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. परंतु अवकाळीमुळे तापमानात काही प्रमाणात घसरण होणार आहे. या भागांत कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5… भेट घ्या pic.twitter.com/85146rYqWs
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 4, 2025
पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट
पुण्यात उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. मंगळवारपासून चार दिवस मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. पुण्यातील कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. तर किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील काही गावांना रविवारी अवकाळी पावसासोबत गारपिटीचा तडाखा बसला. या गारपिटीमुळे पपई, केळी तसेच फळपिकांचे नुकसान झाले आहे. तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. पवनार, सुरगाव, कान्हापूर, रेहकी आदी गावांत गारपीट, अवकाळी पाऊस झाला आहे.
