अंजली दमानियांचा जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप, म्हणाल्या हगवणे कुटुंबातील सूनांना…, प्रकरणात मोठं ट्विस्ट

वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केली आहे, सासरच्या छळाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.

अंजली दमानियांचा जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप, म्हणाल्या हगवणे कुटुंबातील सूनांना..., प्रकरणात मोठं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 24, 2025 | 5:02 PM

काही दिवसांपूर्वी पुण्यातील विवाहित तरुणी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली, तिने गळफास घेऊन आपलं जीवनं संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद  आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, मात्र प्रकरण समोर येताच त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील व्यक्तींना ज्याने बंदुक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाण याला जालिंदर सुपेकर यांनीच बंदुकीचा परवाना दिल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. सुपेकरांचे आणि हगवणे यांचे जवळचे संबंध होते. हगवणे कुटुंबानं आपल्या सुनांना जालिंदर सुपेकरांचा धाक  दाखवला, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया?  

हगवणे कुटुंबातील सर्व आरोपींना अटक झाली, हे पाहून बरं वाटलं. अजून एक व्यक्ती आहे, त्यांनी या कुटुंबाला मदत केली होती, ते म्हणजे आयपीएस जालिंदर सुपेकर, त्यांच्याबद्दल  अनेक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण याला बंदुकीचं लायन्सस सुपेकर यांनी दिलं. हगवणे यांची सून मयुरीच्या आईने देखील जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात महिला आयोगामध्ये पत्र दिलं होतं. जालिंदर सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे होती, म्हणूनच त्यांनी हे सर्व केलं. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही त्यांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा  सुपेकर यांच्यामुळेच असा गंभीर आरोप यावेळी दमानिया यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मयुरीला देखील जो त्रास झाला तो देखील सुपेकर यांच्यामुळेच झाला, तिच्या आईने याविरोधात महिला आयोगाला पत्र दिलं होतं. सुपेकरांवर तातडीनं कारवाई व्हायला हवी अशी मागणी यावेळी दमानिया यांनी केली आहे.