महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर! विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणाला किती जागा?

या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. कोणाला किती जागा? हे महायुतीच्या घटकपक्षांमध्ये ठरवलं जात आहे. दरम्यान, आता या निवडणुकीसाठी महायुतीचे संभाव्य जागावाटप समोर आले आहे

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर! विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणाला किती जागा?
mahayuti seat sharing formula
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2026 | 7:57 PM

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे 16 आमदार विधानपरिषदेसाठी निवडले जाणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. कोणाला किती जागा? हे महायुतीच्या घटकपक्षांमध्ये ठरवलं जात आहे. दरम्यान, आता या निवडणुकीसाठी महायुतीचे संभाव्य जागावाटप समोर आले आहे.

महायुतीचा फॉर्म्यूला काय?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्यूला समोर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकूण 16 जागांपैकी 12 जागा या भाजपासाठी असतील. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 3 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी पक्षाला एकूण 2 जागा दिल्या जाऊ शकतात. महायुतीच्या भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही जागांची अदलाबदली होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

महाविकास आघाडीकडूनही तयारी सुरू

दुसरीकडे या जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही जोमात तयारी चालू आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणकोणत्या नेत्यांना मैदानात उतरवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्या महाविकास आघाडीत या निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे.

कुठे-कुठे होणार निवडणूक?

राज्यात एकूण सोळा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर- बीड, हिंगोली-परभणी, संभाजीनगर-जालना या सोळा जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान कधी, निकाल कधी

दरम्यान, विधानपरिषदेच्या या 16 जागांसाठी 25 मे रोजीपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. येत्या 1 जूनपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 2 जूनपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 4 जून असेल. या जागांसाठी 18 जून रोजी मतदान होईल. तर 22 जून रोजी मतमोजणी म्हणजे निकाल लागेल. या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? तसेच या निवडणुकीसाठी काय रणनीती आखली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us