विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हायव्होल्टेज घडामोडी, कुणी-कुणी घेतली माघार?

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच आता सुटला आहे. शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हायव्होल्टेज घडामोडी, कुणी-कुणी घेतली माघार?
विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हायव्होल्टेज घडामोडी
| Updated on: Jun 12, 2024 | 6:50 PM

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघांची निवडणूक पार पडत आहे. तर नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी देखील निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. यापैकी काही उमेदवारांची मनधरणी करण्यात त्या-त्या आघाडीच्या दिग्गज नेत्यांना यश येताना दिसत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पडद्यामागे अनेक हालचाली घडल्या. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार या निवडणुकीत उतरले होते. काँग्रेसचे दिलीप पाटील आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांनी अर्ज दाखल केला होता. पण शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि ठाकरे गटात दिलजमाई झाली. यातून काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे इथे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत.

नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांचीदेखील माघार

महायुतीच्या गोटातदेखील नाशिक शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी वेगवान घडामोडी घडल्या. भाजपचे राजेंद्र विखे , धनराज विसपुते यांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी आता महायुतीमधील अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, शिंदे गटाचे किशोर दराडे, मूळचे भाजपचे मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले विवेक कोल्हे मैदानात आहेत.

कोकण पदवीधरमध्ये भाजपचा मार्ग मोकळा

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच आता सुटला आहे. शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनीदेखील माघार घेतली. मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याकडे अभिजीत पानसे यांची उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. फडणवीस यांच्या विनंतीचा मान ठेवून राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं. दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून भाजपच्या बंडखोर उमेदाराने माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरणारे यांनी माघार घेतली आहे.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी कोण-कोण उमेदवार?

  1. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्याच्या घडीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे मैदानात आहेत.
  2. मुंबई शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे, ठाकरे गटाचे ज मो अभ्यंकर, शिक्षकभारतीचे सुभाष मोरे आणि भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे हे सध्याच्या घडीचे उमेदवार आहेत.
  3. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तगडी आहे. कारण इथे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात आहे.
  4. कोकण पदवीधर मतदारसंघातील लढत ही भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर अशी थेट आहे.