लाडक्या बहिणींचा महायुतीला श्राप लागणार, अंतकरणातून श्राप आल्यावर सत्यानाश… विजय वडेट्टीवार यांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लाडकी बहिण योजनेवरुन सरकारला चांगलेच सुनावले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजना, ओबीसी आरक्षण, वाढती महागाईवरून सरकारला सडकून धारेवर धरले आहे. त्यांनी थेट लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडून दिले आहे असे खळबळजनक विधान केले आहे.
लाडक्या बहिणींचा महायुतीला श्राप लागणार
लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना वगळण्यात आले आहे. या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “80 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या याचा अर्थ निवडणुकीत वापर झाला. निवडणुका झाल्या आता लाडकी बहीण तुझा आणि आमचा काय संबंध.. भाऊ इकडे बहीण तिकडे.. भाऊ खुर्चीवर बसून मज्जा करत दाबून माल खात आहे. महाराष्ट्र लुटत आहे आणि लाडक्या बहिणींना हवेवर सोडून दिला आहे.”
पुढे ते म्हणाले, “80 लाख महिला कमी केल्या त्यांचं श्राप या महायुतीच्या सरकारला लागणार. या महिलांचं श्राप मोठा असतो. जेव्हा महिला अंतकरणातून श्राप देते तेव्हा यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. असंच आता गावागावात सत्यनास करण्यासाठी टपलेली आहे. हे जेव्हा आता पुन्हा मतं मागण्यासाठी जातील तेव्हा यांची पूजा केली जाईल.”
‘काँग्रेसमुक्त’ नाही, भाजप आता ‘काँग्रेसयुक्त’
भाजपकडून काँग्रेसचे चार उमेदवार आयात केल्याच्या प्रश्नावर त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. “मी आता काँग्रेसवाल्यांना सांगतो की आपण सर्वच भाजपात जाऊ आणि भाजपला घेऊन काँग्रेसमध्ये येऊ, म्हणजे देश ‘भाजपमुक्त’ होऊन जाईल. आज अर्ध्याहून जास्त मुख्यमंत्री, आमदार आणि विधान परिषदेचे उमेदवार काँग्रेसमधून आलेले आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणारी भाजप आता ‘काँग्रेसयुक्त’ होत चालली आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
भाजपची एवढी ताकद असूनही ते घाबरलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरीने पावले टाकत शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही. काँग्रेस मात्र पूर्ण ताकतीने लढत असून चंद्रपूरमध्ये शैलेंद्र अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अग्रवाल हे केवळ व्यापारी नसून किसान सेलचे राष्ट्रीय सचिव व तीन-चार राज्यांचे प्रभारी आहेत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.