जे ठाकरे बंधू आरोप करायचे, तेच आरोप करण्याची शिंदे गटावर वेळ… डोंबिवलीत काय घडलं?

KDMC Election 2025 : शिवसेना ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा उपस्थित केला होता. अशातच आता शिवसेना शिंदे गटावरही असा आरोप करण्याची वेळ आली आहे.

जे ठाकरे बंधू आरोप करायचे, तेच आरोप करण्याची शिंदे गटावर वेळ... डोंबिवलीत काय घडलं?
Voter List Fraud in KDMC
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 25, 2025 | 6:20 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम पहायला मिळत आहे. या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा उपस्थित केला होता. अशातच आता शिवसेना शिंदे गटावरही असा आरोप करण्याची वेळ आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी 22 नंबरच्या प्रभागात मतांची आदलाबदल झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोंबिवलीत 4500 मतदार दुसरीकडे हलवले

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या माजी सभापती आणि माजी नगरसेवकांनी देखील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माजी सभापती विकास म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक 22 मधील 4500 मतदार दुसरीकडे हलवले असल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

मतदार यादीत नक्कीच काहीतरी घोळ – विकास म्हात्रे

यावर बोलताना विकास म्हात्रे यांनी म्हटले की, ‘प्रभाग क्रमांक 22 मधील 4500 मतदार इतर पॅनलमध्ये हलवले आहेत. प्रभागाच्या सीमावर्ती भागातील नावे हलली असती तर आम्ही मान्य केले असते, पण प्रभागाच्या मध्यभागातील साडेतीन हजार पेक्षा जास्त मतदारांची नावेच दुसरीकडे कशी गेली? यात नक्कीच काहीतरी घोळ आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून हिरावला जात असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयातही जाणार.’

निवडणूक आयोगाकडे सर्वांचे लक्ष

पुढे बोलताना म्हात्रे म्हणाले की, माझ्या प्रभागात 4500 मतांची रहस्यमयीरित्या अदलाबदल झालेली आहे. जर निवडणूक आयोगाने ही दुरुस्ती केली नाही आणि यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे शोधली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ती शोधून काढू असा देखील इशारा देखील त्यांनी दिला आहे. मतदार यादीतील या घोळामुळे डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 22 मधील मतदारांमध्ये या घोळामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.