
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रुबाबदार नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले आहे. रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे बारामती दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाले होते. मात्र, विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच नियंत्रण सुटल्यामुळे शेतात कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत असलेल्या विमानातील इतर चारही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आता या विमान अपघाताचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. अपघात झालेल्या शेताजवळील एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी मोठा स्फोट झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज आला. या घटनेची भीषण दृश्य आता समोर आली आहेत. जेट ज्यावेळी आकाशातून खाली आलं तेव्हा आकाशात काही वेळ घिरट्या घालत होते. त्यानंतर ते हळूहळू खाली येत गेलं.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही फूटेज पाहा:
विमान कोसळल्यानंतरही स्फोट झाले
एका बाजूने झुकलेलं हे विमान एका शेतात जाऊन कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. स्फोट होतच विमान खाली कोसळत असल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विमान जमीनीवर पडल्यानंतरही स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. आजूबाजूच्या लोकांना काही सेकंद लागली नेमकं काय झाले आहे हे काळायला.
विमान कोणाच्या मालकीचे?
उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान VSR (व्हीएसआर) या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 (Learjet 45) हे या विमानाचे मॉडेल होते. ही विमाने प्रामुख्याने खाजगी प्रवासासाठी वापरली जातात. ते विमान अत्याधुनिक जेट स्वरुपातील होते. VT-SSK असा या विमानाचा नोंदणी क्रमांक होता. या विमानाचे कॅप्टन रोहित सिंग होते. या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग हे आहेत. या विमानात उपमुख्यमंत्र्यांसह एकूण पाच जण स्वार होते.