रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज
भारतीय रेल्वे स्थानके आता केवळ प्रवासापुरती उरली नसून त्याजागी एअरपोर्ट सारखी खरेदीची सोय आणि इतर सुविधा मिळत आहेत. उपनगरीय रेल्वे स्थानके अनेक सुविधांचे केंद्र ठरणार आहेत.

मुंबई सेंट्रल स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या डिजिटल लाऊंजमध्ये अगदी विमानतळासारख्या सोयी आणि सुविधा मिळणार आहेत. भारतीय रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेवर हा पहिलाच प्रकल्प साकारण्यात येत आहे. या आधी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकात पॉड हॉटेलची उभारणी झाली होती. आता या नव्या डिजिटल लाऊंजमध्ये नेमक्या काय आहेत सुविधा ते पाहूयात….
पश्चिम रेल्वेचा पायलट प्रकल्प म्हणून मुंबई सेंट्रल येथे देशातील पहिले डिजिटल लाऊंज उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २.७१ कोटी रुपये खर्च येणाक आहे. एकूण १७१२ चौ.फु. जागेत ही सुविधा उभारली जात आहे. प्रवाशांसाठी वायफाय, प्लग पॉइंट, चार्जिंग सॉकेट्स, टेबल, सोफा, कॅफे आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
‘वर्क फ्रॉम स्टेशन’, ऑफिस आणि कॉलेजचे काम सहज शक्य…
मुंबई सेंट्रल येथील उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या डिजिटल लाऊंजमुळे रेल्वेला दरवर्षी ५० लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. ही सुविधा फक्त प्रवाशांसाठी नाही, तर शहरातील फ्रीलान्सर्स आणि व्यावसायिकांसाठीही देखील खुली असणार आहे. मुंबई सेंट्रलनंतर वांद्रे टर्मिनस, वडोदरा, अहमदाबाद येथेही अशी सुविधा उभारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. रेल्वे स्थानक आता केवळ प्रवासाचे नव्हे, तर येथे अनेक सोयी सविधांचे केंद्र ठरणार आहे.
