फडणवीसांचं आश्वासन बावनकुळेंनी घेतली भेट, तरीही बच्चू कडू उपोषणावर ठाम, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बच्चू कडू यांचं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे, आज बावनकुळे यांनी त्याची भेट घेतली, तसेच फडणवीस यांनी देखील त्यांच्याशी संवाद साधला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर 17 विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे, दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली, त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला, फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मात्र तरी देखील बच्चू कडू हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या चर्चे नंतरही बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत. ज्या ज्या पक्षानी ज्या ज्या संघटनानांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांच्याशी चर्चा करून उद्या निर्णय घेऊ, कर्जमाफी संदर्भात प्रक्रिया सुरू झाली हे आमच्या अन्नत्याग आंदोलनाचं यश आहे. सरकार आता समिती गठीत करणार आहे. दिव्यांगा संदर्भात सरकार मानधन वाढवण्यासाठी तयार आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उद्या दुपारी दोन वाजता उपोषण सुरू ठेवायचं की नाही यावर बच्चू कडू हे निर्णय घेणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता उपोषण स्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठमध्ये पुढील निर्णय घेतला जाणार आहे. शनिवारी मंत्री उदय सामंत हे देखील बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत.
बावनकुळे काय म्हणाले?
आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत, त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.