गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा मुंडेंनी थेट घेतली या दोन नेत्यांची नावं, धनंजय मुंडेंनाही धक्का
गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार कोण या प्रश्नावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे, आता यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता, यावरून वातावरण चांगलंंच तापलं होतं, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात वारसा हा जन्मानं नाही तर विचारांचा असतो. मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. 2009 पासून मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष पाहात आहे, त्यामुळे भुजबळ जे बोलले ते बरोबर बोलले, धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं.
तर त्यानंतर प्रकाश महाजन यांची देखील यावर प्रतिक्रिया समोर आली. प्रकाश महाजन यांनी करुणा मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांचा दावा खोडून काढत पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर टीपी मुंडे यांनी मात्र आपणच मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचा दावा केला तर सारंगी महाजन यांनी मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान आज यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, जालन्यात बंजारा समाजाला एसटी वर्गातून आरक्षण मिळावं यासाठी विजय चव्हान यांचं उपोषण सुरू आहे, त्यांची भेट घेण्यासाठी जे सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. यावेळी त्यांना भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता, त्यांनी थेट मुंडे साहेबांचे वारसदार हे संजय राठोड आणि अर्जुन खोतकर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
