नवीन राजकीय पक्ष काढणार? मनोज जरांगेंचं मोठं विधान; काय दिलं उत्तर?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नवीन राजकीय पक्ष काढण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवीन राजकीय पक्ष काढणार? मनोज जरांगेंचं मोठं विधान; काय दिलं उत्तर?
Manoj Jarange Patil on Political Party
Image Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 3:33 PM

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते, मात्र सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आज पत्रकाराशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. जरांगे पाटलांना नवीन राजकीय पक्ष काढण्यावरही प्रश्न विचारण्यात आला होता, यावरही जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मी इमानदारीने लढाई लढत आहे – जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या प्रमाणपत्र वाटपाबाबतच्या अधिसूचनेबाबत विचारले असता जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मंगळवार पासून आदेश काढण्याचे काम सुरू होणार आहे. आता काम थांबणार नाही. कुणाचाही दबाव आला तरी आता काम थांबणार नाही. सरकार आता मराठा समाजावर अन्याय होईल असे पाऊल उचलणार नाही.’ जीआर न घेता उपोषण का सोडले यावर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘सामान्य जनतेला माहिती आहे. मी इमानदारीने लढाई लढत आहे. मी कधीही हटलेलो नाही. कोर्टात जीआर जाणार नाही असे काही करायचे नाही असे विखे पाटील यांनी सांगितिले आहे. एका महिन्यात जीआर दिसेल.’

विधानपरिषदेच्या उमेदवारीवर भाष्य

सध्याच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अनेक आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यावर बोलताना जरांगे पाटलांनी सांगितले की, काल एका पक्षात होते, आज दुसऱ्या पक्षात आहेत. आता नेत्यांची पोरं उमेदवार आहेत, कार्यकर्त्यांनी काय करावं? लोकांनी शहाणं व्हावं. ते जनतेचा विचारच करत नाहीच. प्रत्येक पक्षाने फक्त पक्षातील कार्यकर्त्यांना डावलले आहे.

जरांगे पाटील राजकीय पक्ष काढणार?

मनोज जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष काढण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘पक्ष नको, नळी-गाड्या काय काय करावं लागतं म्हणून नको. एखाद्याने पक्ष काढला पाहिजे म्हणजे सर्व चांगलं होईल असं नाही. त्या मुलाने कॉक्रोज पार्टी काढली पण त्यालाही धमकी येत आहे. एखाद्या खमक्या नेत्याने नवीन पक्ष काढला पाहिजे.’

Follow Us