मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटातील मंत्र्याच्या अडचणी वाढणार? असीम सरोदे यांच्या ट्विटने खळबळ, केला मोठा दावा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, असीम सरोदे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. सरोदे यांनी मोठा दावा केला असून, या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे. कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात इडीने तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला होता, हा अहवाल विशेष पीएमएलए कोर्टाने स्विकारला आहे. मुळ प्रकरणच बंद झाल्यामुळे आता मनी लॉन्ड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे काही कारण नसल्याचं ईडीने म्हटलं होतं. दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केल्यामुळे मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माझी दिवाळी गोड झाली अशी प्रतिक्रिया देखील यावर मुश्रीफ यांनी दिली आहे.
मात्र त्यानंतर आता याच सर्व प्रकरणावर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे. ‘हसन मुश्रीफ यांच्यावरील 100 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास बंद झाल्याने विषय संपलेला नाही. क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकते. सामाजिक संवेदनशीलता असलेला कोणताही नागरिक या निर्णयाला कायदेशीर आव्हान देऊ शकतो. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही निर्णयाला आव्हान देऊ शकतात. अनेकजण न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण निर्णयाचा अभ्यास करून पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत निश्चितता ठरवता येईल,’ असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान असीम सरोदे यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
2023 मध्ये शेतकऱ्यांना साखर कारखान्यात भागधारक करण्याचे आश्वासन देऊन, निधी गोळा केल्याचा मुश्रीफ कुटुंबावर आरोप झाला होता. सुमारे 40 हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ही रक्कम मुश्रीफ यांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोप इडीकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता याच प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्विकारला आहे.