पनवेल ते वसई थेट लोकल! 17 रेल्वे स्टेशन अन् 12710 कोटींचा प्रस्ताव, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?
पनवेल ते वसई थेट लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित प्रकल्पात 17 रेल्वे स्टेशन आहे. हा12710 कोटींचा प्रस्ताव आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकल्प

पनवेल-वसई उनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या उभारणीला गती मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प तब्बल 69.23 किमी लांबीच्या या मार्गिकेसाठी 12710 कोटी 82 लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलाय. पनवेल ते वसई थेट लोकल सेवेने प्रवाशांना लाभ मिळणार आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकल्प
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प अंतर्गत हा प्रस्तावित मार्ग आहे. या मार्गावर 17 स्थानके उभारण्यात येणार आहे. महामार्ग आणि खाड्यांमुळे निर्माण होणारे अडथळे टाळण्यासाठी सुमारे 28 किमीचा मार्ग उन्नत स्वरुप बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकल्पाला केंद्राच्या आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या पनवेलहून वसई-विरार परिसरात जाण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे वसई-विरार भागात जाण्यासाठी प्रवाशांना कुर्ला, दादर किंवा इतर स्टेशनवरून ट्रेन, मार्ग बदलून प्रवास करावा लागतो. या प्रकल्पात पनवेल ते वसईदरम्यान थेट उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध असणार आहेत. नव्या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ आणि रेल्वे बदलण्याचा त्रास कमी होणार आहे.
कोणाला होणार फायदा?
नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार भागात लोकवस्ती वाढू लागली आहे. तसेच या भागात औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार वेगाने होत आहे. लोकसंख्या वाढू लागल्याने नव्याने रोजगार केंद्रे विकसित होत आहे. यामुळे या भागात सार्वजनिक वाहतुकीची गरज पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित हा प्रकल्प पनवेल-वसई रेल्वे कॉरिडॉर हा मुंबई महानगर उपनगरी रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. या नव्या नागरी क्षेत्राला रेल्वेची जोड मिळाल्यास रस्ते वाहतुकीवर अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, असं सांगितलं जात आहे. या मार्गावरील महामार्ग आणि खाड्यांमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी सुमारे २८ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पनवेल ते वसई थेट लोकलमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
