
Pranjal Khewalkar : पुण्यातील खराडी येथे रात्री चालू असलेल्या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण नंतर राज्यभरात गाजले. पार्टीत खडसेंच्या जावयाला रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या रेव्ह पार्टीत अमलीपदार्थ सदृश वस्तू आढळल्या, दारूच्या बॉटल्स आढळल्या, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, आता याच प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिला आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर यांना पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेली असताना आता महिला आयोगाने मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. महिला आयोगाने थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. तसेच खेवलकरांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने राज्य महिला आयोगाकडे खेवलकर यांची एक तक्रार केली आहे. याच तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलवल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वत:च्या नावाने हॉटेल बुक केल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मानवी तस्करीसंदर्भात केलेल्या आरोपींची चौकशी करावी, असं महिला आयोगाने पुणे पोलिसांना म्हटले आहे.
दरम्यान, आता या तक्रारीनंतर प्रांजल खेवलकर यांच्यातर्फे तसेच एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महिला आयोगाच्या पत्रानंतर आता पुणे पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.