IMD कडून अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यातील शाळा उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Yavatmal Schools Closed : भारतीय हवामान विभागाने उद्या यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

IMD कडून अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यातील शाळा उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Yawatmal School Close
Image Credit source: Google
| Updated on: Jul 30, 2026 | 9:36 PM

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने उद्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शैक्षणिक संस्थांना लागू राहणार करण्यात आला आहे. मात्र पूर्वनियोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. संबंधित परीक्षा केंद्रांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात असं प्रशासनाने म्हटलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शाळा उद्या बंद

यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, काही रस्ते बंद झाले आहेत. तसेच मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार शुक्रवार, 31 जुलै रोजीही जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

  • अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
  • नदी, नाले, ओढे, बंधारे व पूरप्रवण भागात जाणे टाळावे.
  • पाण्याने भरलेले रस्ते किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
  • विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये.
  • विद्युत खांब, तुटलेल्या वीजतारा किंवा विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
  • वाहनचालकांनी पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवू नये.
  • जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
  • नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
  • लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
  • शेतकरी बांधवांनी हवामान सुरक्षित झाल्यानंतरच शेतातील कामे करावीत.
  • अफवांवर विश्वास ठेवू नये व केवळ प्रशासन व भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us