Chhagan Bhujbal: ते 10 टक्के आरक्षण नकोय का? छगन भुजबळांचा मराठा समाजाला रोखठोक सवाल; कायदाही सांगितला!
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 10 टक्के आरक्षण नकोय का? असा सवालही त्यांनी मराठा समाजाला केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेत्यांनी कोर्टात जाण्याची आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. अशातच आज ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
10 टक्के आरक्षण नको आहे का?
मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागितले होते, जे सरकारने दिले आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘याआधी हायकोर्टात प्रश्न उपस्थित झाला होता की, मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहात, एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे. मग तुम्हाला मिळालेलं 10 टक्के आरक्षण नको आहे का? त्याआधी मिळलेलं 10 टक्के EWS आरक्षण नको आहे का? ओपनमध्ये तुम्ही आहात त्याचा लाभ नको आहे का? याचं उत्तर काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं मी म्हटलं होतं.’
मराठा समाजाला ओबीसीत घेता येत नाही – भुजबळ
पुढे बोलताना भुजबळ यांनी म्हटले की, ‘एकदा हैदराबाद गॅझेटप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायची सुरुवात झाली की आपण अनेक संकटांना आमंत्रण देतो. अनेक प्रश्न उपस्थित होतात, हा त्यामागचा अर्थ आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, असे याआधीच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. त्यामुळेच या समाजाला ओबीसीत घेता येत नाही. पण अलिकडे जे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत.’
मनोज जरांगेंनी दबाव निर्माण केला – भुजबळ
‘मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण केला. तीन ते चार दिवस दक्षिण मुंबई बंद करण्यात आली. त्यानंतर जे निर्माण झालं त्यानंतर आता वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत. ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे. भटक्या विमुक्तांचंही नुकसान होत आहे’ असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
