
नाशिकच्या सारूळ येथील जंगलात काल एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून या हत्या प्रकरणाचा देखील उलगडा झाला आहे प्रियकराने मित्राच्या मदतीने अल्पवयीन प्रेयसीला संपवल्याची घटना घडली आहे. या हत्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयित आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नाशिकच्या वाडीवरहे पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सारूळ येथील जंगलात काल एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रेम प्रकरणातून या मुलीची हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या मुलीची हत्या झाली ती मुलगी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथील रहिवासी होती तर इयत्ता अकरावी मध्ये ती अकोल्यात शिक्षण घेत होती. अल्पवयीन तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील होते, तिचा 19 वर्षीय प्रियकर अथर्व देशमुख हा नाशिकच्या संदीप फाऊंडेशन या महाविद्यालयात शिक्षण घेत होता बुलढाण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना रस्त्यातच त्याने त्या तरुणीची हत्या करत तिचा मृतदेह सारूळ येथील जंगलात टाकून दिला. ज्या मुलीचा मृतदेह आढळून आला ती मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार अकोला येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यावरून पोलिसांना ओळख पटविण्यात यश आलं आणि त्यानंतर तिच्यात कुटुंबियांना ला माहिती देण्यात आली.
अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर नाशिक पोलीसांनी अथर्व देशमुख आणि त्याचा साथीदार सुमित देशमुख या दोघांना ताब्यात घेतले आहे. या हत्या प्रकरणात आणखी कुणाचा समावेश आहे का याचा तपास आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याबाबत बोलताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, ‘नाशिकच्या वाडीव्हरे परिसरात मुलीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ असलेल्या कीचेन वरून तपास सुरू केला. सदर मुलीचे अकोला पोलीस स्टेशन हद्दीतून अपहरण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर काही संशयितांची नावे समोर आली. सातपूर परिसरात 1 संशयित आढळून आला. सदर मुलगा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मुलगी 11 वी त तर मुलगा 13 वीमध्ये आहे. नाशिकच्या संदीप फाउंडेशन मध्ये मुलगा शिक्षण घेत आहे. दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत. मुलीचे दुसरीकडे अफेअर असल्याचा संशय आल्याने बाचाबाचीत हा प्रकार घडला आहे. सध्या अधिक तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावर ही हत्या झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.’