अजितदादा होते तेव्हा विषय वेगळा, आता खुद्द पवार साहेब…युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला रंग चढला!

Yugendra Pawar Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील राजकारणाचा रंग दिसून येणार आहे. युगेंद्र पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

अजितदादा होते तेव्हा विषय वेगळा, आता खुद्द पवार साहेब...युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला रंग चढला!
| Updated on: Oct 04, 2026 | 7:18 PM

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल उभे करण्यात आले आहे. श्री सोमेश्वर मंदिरात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले की. दादा होते तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. साहेबांनी सांगितले की अजित होता तोपर्यंत मी खाली लक्ष घालत नव्हतो. पण आता मी यात लक्ष घालणार आहे.

युगेंद्र पवार म्हणाले की, साहेब म्हणाले की दुर्दैवाने आता अजित आता राहिला नाही, हा कारखाना सभासदांचा आहे त्यांचा तो राहिला पाहिजे यासाठी मी त्यात लक्ष घालणार आहे. आम्ही ८० हून अधिक गावांचे दौरे केले लोक म्हणत आहेत की आता पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. आम्ही सर्व उमेदवार देऊन पॅनल उभे केले आहे. आपले उमेदवार सामान्य आहेत. मोठ्या गाड्या नाहीत.गाडीचा नंबर ५५५५ असा दिसणार नाही. काही उच्चशिक्षितांना आपण उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते सामान्य उमेदवार अजिबात नाहीत. कारखाना ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात, असं त्यांनी सांगितलं.

Loading...

ते म्हणाले की, आपण सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल उभे केले आहे. आपलं पॅनल एकच आहे की ज्याने सभागसदांचे हित आणि विकास पाहून तसे नाव दिले. यावेळी उमेदवारांची ओळख करून देत असताना अचानक खालून एक कार्यकर्ता युगेंद्र पवारांना म्हणाला दादा लव्ह यू… त्यावर युगेंद्र पवार हसले आणि म्हणाले मी तुम्हाला लव्ह यू टु म्हणालो असतो पण अलीकडील काळात हे जरा जास्त झालं आहे असं म्हणताच एकच हशा पिकला. आम्ही तीन महिलांना उमेदवारी दिली आहे दुसऱ्या पॅनल ने दोनच महिलांना उमेदवारी दिली आहे. आमचं एकमेव पॅनल आहे. ते तीन महिलांना उमेदवारी देणारे आहे. साहेब नेहमीच सांगत असतात की महिलांना प्रोत्साहन द्या.

युगेंद्र पवारांनी सांगितले की, गरदडवाडी गावाला संचालक पदासाठी पहिल्यांदा संधी मिळाली आहे. पलीकडे खंडोबाची वाडी आहे. तिथे तेच तेच पंधरा वर्ष उमेदवार होते. आम्ही हे ओळखलं आणि गरदडवाडी गावाला संधी दिली. आमचे विरोधक काय कमी नाहीत. आता आम्हालाही हळूहळू अनुभव यायला लागला आहे. कारखान्यात अनेक उपपदार्थ तयार होऊ शकतात. ज्यातून सभासदांना अधिकचा दर मिळू शकतो. तुम्ही नेहमी शरद पवार यांना साथ देत आला आहात मला साथ देत आला आहात.

ते म्हणाले की, कारखान्याच्या कामात पारदर्शकता असायला हवी. कारखाना चांगला चालवायचा असेल तर कामगार मेरिटवर घेतले पाहिजेत. वशिल्यावर नाही. बरेच लोक बोलतात की, आता साहेबांची सत्ता नाही, पण साहेब एवढे मोठे महान नेते आहेत की सत्ता असो अगर नसो आपली कामे होतात. इथे म्हणजे बारामतीत भाजप मागच्या दराने यायचा प्रयत्न करत आहे. देशाचे पंतप्रधान आपल्या साहेबांना गुरू मानतात. ते बारामतीत बोलले आहेत. आता ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान बारामतीत येत आहेत. आपली जी कामे असतील ती साहेब त्यांना सांगतील आणि ती कामे होतील.

युगेंद्र पवार पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रातील खूप मोठा अनुभव साहेबांना आहे. त्याचा आपल्याला फायदा होईल. आमचं पॅनल निवडून आलं तर आठवड्यातील एक दिवस मी कारखान्याला देईल. इथे बसून राहील आणि वेळ पडली तर साहेबांचे मार्गदर्शन घेईल. पण हा कारखाना चांगला चालवून दाखवेल. फक्त तुम्ही मला साथ द्या. आता हे लोक खूप चिखलफेक करतील पण आपण त्यात पडायचे नाही. त्यांना जे करायचे ते करू द्या. आपण आपला प्रचार करा. दुसऱ्याला शिव्या देऊन तुम्ही मोठे होणार नाहीत.सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवा. सर्व सभासद शेतकरी हुशार आहेत त्यांना माहीत आहे काय चालले आहे. किटली हे आपलं चिन्ह आहे आणि किटली शिवाय कपबशी भरत नाही. दुसरं जे चिन्ह आहे ते शिट्टी. ती आपण सावध करायला वाजवतो. त्यामुळे सभासदांना सावध करा भाजप इथे आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us