काँग्रेसला दरवाजे बंद; ओवेसींची शेवटपर्यंत वाट पाहणार : प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) आपली रणनिती स्पष्ट केली आहे.

काँग्रेसला दरवाजे बंद; ओवेसींची शेवटपर्यंत वाट पाहणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई: लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) आपली रणनिती स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस (Congress) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी स्वतः काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याची  माहिती दिली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही कोणताही फरक झालेला नाही. काँग्रेस अजूनही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशीही आम्ही बोललो. त्यातून काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा राहिलेली नाही.”

‘विधानसभा निवडणुकीत आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून युती नाही’

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. आता आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. यापुढे वेळ फार कमी आहे. त्यामुळे निवडणूक वेळापत्रक लक्षात घेता आम्हाला प्रचारासाठीही वेळ हवा आहे.

आता युतीच्या भानगडीत पडणार नाही, जे येतील त्यांना सोबत घेणार

प्रकाश आंबडेकरांनी काँग्रेससोबतच्या युतीसाठी चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “काँग्रेस 3-4 महिने आम्हाला खेळवत राहिली आणि युती टाळली. आता युतीच्या भानगडीत पडणार नसून आम्ही आमची वाटचाल सुरू केली आहे. यापुढे जे कुणी येतील त्यांना सोबत घेऊ.”

‘एमआयएमसोबत युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न’

काँग्रेससोबत युती करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट करतानाच आंबेडकरांनी एमआयएमबाबत बोलणे सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “एमआयएमसोबत युतीसाठी बोलणी सुरू आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे. ओवेसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे.”

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला. भाजपला वंचित बहुजन आघाडीची भीती असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच काँग्रेस भाजपसोबत हातमिळवणी करत असल्याचा आरोप केला.

‘निवडणुकीतील ईव्हीएम हॅकिंगला हॅकिंगनेच उत्तर’

ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकरांनी नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “मला हॅकर्सने एक चांगली बातमी दिली आहे. जर निवडणुकीत कुणी ईव्हीएम हॅकिंग करणार असेल, तर आम्ही त्यालाच हॅक करू, असा निर्णय हॅकर्सने घेतला आहे. कुठल्याही ईलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ट्रॅकर असेल, तर ते हॅक होतं. यात ईव्हीएमचाही समावेश आहे. हॅकर्सने ईव्हीएम मशीन हॅक करू देणार नाही. तुम्ही आश्वस्त राहा, असं आश्वासन दिलं आहे.”

‘न्यायालयाने परवानगी दिल्यास ईव्हीएम हॅक करुन दाखवणार’

एका हॅकरने न्यायालयाने परवानगी दिल्यास ईव्हीएम हॅक करुन दाखवण्याची तयारी दर्शवल्याचंही आंबेडकरांनी सांगितलं. ते म्हणाले, “न्यायालयाने परवानगी दिल्यास आम्ही ईव्हीएम कसं हॅक केलं जातं त्याचं प्रात्यक्षिक दाखवू शकतो. आता आम्ही ईव्हीएमवर एकाच न्यायालयात सुनावणीची मागणी करणार आहोत. आम्हाला संधी द्या. आम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवू.”

‘मोदींनी ट्रम्प यांना दिलेल्या टाळीची किंमत शेतकऱ्यांना भोगावी लागणार’

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणाले, “मोदींनी ट्रम्प यांना दिलेल्या टाळीची किंमत शेतकऱ्यांना भोगावी लागणार आहे. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध (Trade War) सुरू झालं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कापसाला भारतात आयात केलं जात आहे. मागील महिन्यात कापसाचे 4 हजार प्रति क्विंटलचे 2 जहाज भारतात आयात करण्यात आले आहेत. यामुळे भारतातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. सध्या कापसाला जाहीर केलेला भाव 4,500 रुपये प्रतिक्विंटल आहे.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *