'तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' हा भाजपचा नारा; देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा' अशी घोषणा वाचली होती. | Sanjay Raut

'तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' हा भाजपचा नारा; देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

मुंबई: कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा वाचली होती. त्याप्रमाणाचे आता भाजप ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. (Shivsena MP Sanjay Raut taunts BJP)

भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला खडे बोल सुनावले. यापूर्वी जातीधर्माच्या मुद्द्यावरून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न झाला. आता भाजपला लसीच्या मुद्द्यावरून देशाचे विभाजन करण्याची तयारी सुरु आहे का, असे राऊत यांनी विचारले.

भाजपला मत न देणाऱ्यांना कोरोनाची लस देणार नाही, अशाप्रकारचे राजकारण क्रुरता आहे. मध्य प्रदेशातही भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि जे.पी. नड्डा यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत मिळणार किंवा नाही, हे स्पष्ट करावे, असेही राऊत यांनी म्हटले.


‘केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का?’
बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. याचा अर्थ भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का, असा सवाल शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला होता. कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला हवी, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? बाळासाहेब थोरातांचा भाजपला सवाल

कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

(Shivsena MP Sanjay Raut taunts BJP)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *