बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? बाळासाहेब थोरातांचा भाजपला सवाल

प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे.

बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? बाळासाहेब थोरातांचा भाजपला सवाल

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस (Balasaheb Thorat Criticize BJP) देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का?, असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारले आहेत (Balasaheb Thorat Criticize BJP).

“कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्याचा भाजपाचा हेतू काय? कोरोना लसीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे. मग तो फक्त बिहारसाठीच का. इतर राज्यात लस देणार नाही? का त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आह”, अशी टीका करत थोरातांनी भाजपाच्या मोफत लसीच्या आश्वासनाचा समाचार घेतला.

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, मोदीजींचे बिहारवर जास्त प्रेम आहे असे म्हटले होते. मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का?”, असे प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केले आहेत (Balasaheb Thorat Criticize BJP).

“निवडणुका आल्या की वारेमाप घोषणा करण्याचा रोग भाजपाला जडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बिहारला 1.25 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, त्या पॅकजचे काय झाले याचा बिहारच्या जनतेला मागील पाच वर्षात अनुभव आला असून त्यांची फसवणूक झाली आहे हे समजण्याइतपत बिहारची जनता सुज्ञ आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यावेळीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले त्याचे काय झाले ते आज पाहतच आहोत. ही सगळी जुमलेबाजी असून त्यात भाजपाचा हातखंडा आहे”, असेही प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.

बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून कोरोना लसीचे राजकारण; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यातून भाजपने सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर टीका केली असून महामारीच्या काळातही भाजपकडून कोरोना लसीचं राजकारण केल्या जात असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Balasaheb Thorat Criticize BJP

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे; सीबीआय प्रकरणावरुन निलेश राणेंचा टोला

भाजपचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही : प्रवीण दरेकर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *