ताप येताच बेशुद्ध पडतात… रहस्यमय आजाराने अख्खं राज्य हादरलं; संपूर्ण गाव झालं क्वॉरंटाईन
राजौरीच्या बडाल गावात एक अज्ञात आजाराने 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे लक्षणे ताप, श्वास घेण्यातील अडचण आणि बेशुद्धता आहेत. तीन कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत आणि 60 हून अधिक लोकांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये एक रहस्यमय आजाराची मोठी भीती निर्माण झाली आहे. या आजाराने आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आजार काय आहे हे कुणालाही माहीत नाही. या आजाराचं रहस्य निर्माण झालेलं आहे. लोक सातत्याने आजारी पडत आहेत. लहान मुलं असो की बुजुर्ग… प्रत्येकजण या आजाराच्या तडाख्यात सापडला आहे. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे की बडाल गावात कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आलं आहे. या ठिकाणी नागरिकांना एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. गावात 44 दिवसात तीन कुटुंबातील 17 लोकांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हाहा:कार उडाला आहे. तर पाच लोक अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
लक्षणं काय?
या आजाराच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना प्रचंड ताप येत आहे. श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. तसेच हे लोक बेशुद्ध पडतानाही दिसत आहे. ताप येताच बेशुद्ध होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. मोहम्मद फजल नावाच्या एका व्यक्तीचा 7 डिसेंबर रोजी या रहस्यमय आजाराने मृत्यू झाला. त्याच्या मेव्हणीच्या तीन मुलींची प्रकृतीही बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी जम्मूत रेफर करण्यात आलं आहे. बडाल गावातील परिस्थिती पाहून या ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहेत. त्यात 60 लोकांना ठेवण्यात आलं आहे.
राजौरीच्या बडाल गावात आतापर्यंत काय झालं?
जम्मूच्या राजौरी गावातील या रहस्यमय आजाराने आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दीड महिन्यात 13 मुलांसह 17 लोकांचा मृत्यू झाला आहे
बडाल गावात तीन कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत
रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 60 हून अधिक लोकांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं आहे
अजून लोक सतत आजारी पडत आहेत
हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे तीन मुलांना जम्मूला रेफर करण्यात आलं आहे. एक गंभीर आहे
सीएम उमर अब्दुल्ला यांनी या गावाची पाहणी केलीय
ADGP आणि मंडलायुक्तांनी गावाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
कुठे कुठे कंटेनमेंट झोन?
पहिला कंटेनमेंट झोन : ज्यांच्या घरात मृत्यू झाले आहेत, अशा घरांसाठी हा कंटन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. या घरांना पूर्णपणे सील केले गेले आहे आणि या ठिकाणी प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या घरात राहणाऱ्या लोकांना कुठेही जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
दुसरा कंटेनमेंट झोन : या रहस्यमयी आजाराने बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना या झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. या लोकांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवले गेले आहे आणि त्यांची आरोग्य स्थिती डॉक्टर्सकडून सतत तपासली जात आहे.
तिसरा कंटेनमेंट झोन : या झोनमध्ये गावातील सर्व कुटुंबांना ठेवले गेले आहे. त्यांचा आहार आणि पाणी यावर मेडिकल स्टाफ सतत लक्ष ठेवून आहे. या कुटुंबांना आहार-पाणी पुरवण्याची जबाबदारी मेडिकल स्टाफवर आहे आणि पोलिसांद्वारे यावर देखरेख केली जात आहे.
रोगाच्या रुग्णांबद्दल माहिती :
जीएमसी मेडिकल कॉलेजचे सुप्रीटेंडंट डॉ. शमीम अहमद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यापासून गावातील तीन कुटुंबांतील 17 लोकांना रहस्यमयी आजार झाला आहे, त्यात सहा लहान मुलेही समाविष्ट आहेत. लोक सतत या रोगाची शिकार होत आहेत. सुरुवातीला 5 जणांना सीएचसी कंडीमध्ये दाखल केले गेले होते, त्यापैकी गंभीरपणे आजारी असलेल्या आजाज खानला हेलिकॉप्टरमधून बुधवारी पीजीआय चंदीगडमध्ये रेफर करण्यात आले आहे. त्याच्या तीन लहान बहिणी जीएमसी राजौरीमध्ये रेफर केल्या गेल्या आहेत. त्यांना सेनेच्या हेलिकॉप्टरने जम्मूमध्ये एयरलिफ्ट केले. पाचव्या रुग्णाला सीएचसी कंडीकडून जीएमसी राजौरीला पाठवण्यात आले.
राजौरीमधील 17 मृत्यूंचे कारण काय आहे? ही एक धक्कादायक बाब आहे. कारण अजूनही या मृत्यूंचे कारण काय आहे हे समजू शकले नाही. मेडिकल तपासणीमध्ये कोणतीही आजाराची लक्षणे दिसली नाहीत. जम्मू-काश्मीर सरकारचे एक प्रवक्ते म्हणाले की, तपासणी आणि नमुन्यांवरून असे संकेत मिळाले आहेत की, या मृत्यूंच्या कारणांमध्ये बॅक्टेरियाचा किंवा विषाणूजन्य कोणताही रोग नाही आणि याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध नाही. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की, या मृत्यूंचे नेमके कारण काय आहे?
केंद्रीय तपास पथक या रहस्यमय रोगाचा शोध घेत आहे. जीएमसी राजौरीचे प्रमुख शुजा कादरी यांनी सांगितले की, तपास पथकाने अन्नपदार्थांचे 200 पेक्षा जास्त नमुने गोळा करून विविध ठिकाणी तपासणीसाठी पाठवले आहेत, ज्यामुळे अन्नात कोणत्याही विषारी पदार्थांचा समावेश आहे की नाही, हे तपासले जात आहेत.
