आणीबाणीच्या काळ्या कालखंडावर… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन काय? पुस्तकात काय?

आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या काळातील संघर्षाचे वर्णन करणारे पुस्तक "द एमर्जन्सी डायरीज" प्रकाशित होत आहे. हे पुस्तक त्यांच्या आणीबाणीविरोधी संघर्षाचे वृत्तांत सांगते. मोदी यांनी आणीबाणीला संविधानाची हत्या म्हटले असून, या पुस्तकाद्वारे तरुण पिढीला या काळाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणीबाणीच्या काळ्या कालखंडावर... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन काय? पुस्तकात काय?
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2025 | 11:00 AM

देशावर आणीबाणी लादल्याला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक नेत्यांनी हा दिवस संविधानाच्या हत्येचा दिवस म्हणून साजरा केला आहे. आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या सर्वात अंधकारमय दिवसांपैकी एक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्यात आणीबाणीच्या काळातील त्यांचा संघर्ष आणि जीवन प्रवासाची माहिती देण्यात आली आहे.

ब्लूक्राफ्ट आणीबाणीवर एक पुस्तक घेऊन येत आहे. ‘द एमर्जन्सी डायरीज – इयर्स दॅट फोर्ज्ड ए लीडर’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात आणीबाणीच्या काळात त्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो संघर्ष केला, त्याची माहिती देण्यात आली आहे. मोदींच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांचे अनुभव आणि अन्य दस्ताऐवजांवर हे पुस्तक आधारीत आहे. हे पुस्तक आज बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.

 

तेव्हा मी संघाचा प्रचारक होतो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवरून हा हल्ला चढवला आहे. जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा मी आरएसएसचा युवा प्रचारक होतो. आणीबाणी विरोधी आंदोलन माझ्यासाठी शिकण्याचा एक अनुभव होता. आणीबाणीने आपल्या लोकशाही व्यवस्थेला टिकवण्याचं महत्त्वच नष्ट केलं. त्यासोबतच मला राजकीय स्पेक्ट्रममधील सर्व लोकांकडून बरंच काही शिकायला मिळालं, असं सांगतानाच ब्लूक्राफ्ट डीजिटल फाऊंडेशनने त्या अनुभवांना संकलित करून त्याचं पुस्तक तयार केलं याबद्दल मला आनंद आहे. या पुस्तकाला एच. डी. देवेगौडा यांनी प्रस्तावना लिहिली आहे. देवेगौडा स्वत: आणीबाणी विरोधी आंदोलनातील एक दिग्गज नेते होते, असं मोदींनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर अनुभव शेअर करा

द एमर्जन्सी डायरीज – इयर्स दॅट फोर्ज्ड ए लीडर’ या पुस्तकात आणीबाणीच्या काळातील माझ्या संघर्षाचं वर्णन आहे. या पुस्तकाने त्या काळातील आठवणी उजागर केल्या आहेत. जे लोक आजही आणीबाणीचे काळे दिवस आठवतात, ज्यांच्या कुटुंबांनी त्या काळात जे कष्ट सहन केले, त्यांनी आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करावेत, असं मी त्यांना आवाहन करतो. त्यामुळे तरुणांमध्ये 1975 ते 1977 या काळातील लज्जास्पद काळाबाबतची जागृती निर्माण होईल, असं मोदींनी म्हटलंय.

 

त्यांना सलाम

आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सलाम करतो. संपूर्ण भारतातून, प्रत्येक क्षेत्रातून आणि वेगवेगळ्या विचारधारेतून लोक आले होते. या सर्वांनी एकाच उद्देशाने एकमेकांच्या साथीने मिळून काम केलं. भारताची लोकशाही व्यवस्था वाचवणं, त्याचं संरक्षण करणं आणि त्याचे आदर्श कायम राखण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जीवन समर्पित केलं होतं. हा एक सामूहिक संघर्ष होता, त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही बहाल करावी लागली. नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या, त्यामध्ये त्यांचा मोठा पराभव झाला, असंही मोदींनी लिहिलं आहे.