PM मोदींचा मॉरिशसच्या पंतप्रधानांना फोन, ‘या’ महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोघांमधील चर्चेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि मॉरिशसमधील विशेष आणि ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याचा पुनरुच्चार केला. या दोघांमधील चर्चेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सहकार्यावर चर्चा
आज झालेल्या फोन कॉलमध्ये दोन्ही पंतप्रधानांनी विकासाची भागीदारी, क्षमता बांधणी (Capacity Building), संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि लोकांमधील संबंध यासारख्या क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 मध्ये रामगुलाम यांनी सक्रीय सहभाग घेतला होता त्याचे कौतुक केले. तसेच पंतप्रधान मोदींनी ‘व्हिजन महासागर’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट पॉलिसी’ बाबतच्या प्राधान्यांबद्दल चर्चा केली.
रामगुलाम भारत भेटीचे आमंत्रण
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान रामगुलाम यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आणि रामगुलाम यांनी शक्य तितक्या लवकर भारताला भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. त्याच बरोबर दोन्ही नेत्यांनी भविष्यात नियमित संवाद आणि परस्पर संपर्क राखण्याबाबतही भाष्य केले.
भारत-मॉरिशस संबंध
भारत आणि मॉरिशसमध्ये दीर्घ काळापासून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध आहेत. मॉरिशस हा हिंदी महासागरातील भारताचा एक महत्त्वाचा पार्टनर देश आहे. भारताचे ‘व्हिजन महासागर’ धोरण हिंदी महासागरात सहकार्य आणि स्थिरता वाढवते, तर ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरण भारताच्या आसपासच्या देशांमधील विकासाला चालना देण्यासाठी राबवले जात आहे.
