एकीकडे महारॅली, तर दुसरीकडे पदयात्रा, दिल्लीत भाजप आणि काँग्रेस भिडणार? दिल्लीत मोठी घडामोड काय?

Congress Maharally Vs BJP Padyatra: दिल्लीत एकीकडे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरूवात झाली असतानाच आता भाजप काँग्रेसविरोधात आक्रमक झाली आहे. यामुळे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत.

एकीकडे महारॅली, तर दुसरीकडे पदयात्रा, दिल्लीत भाजप आणि काँग्रेस भिडणार? दिल्लीत मोठी घडामोड काय?
एकीकडे महारॅली, तर दुसरीकडे पदयात्रा, दिल्लीत भाजप -काँग्रेस भिडणार?
| Updated on: Nov 01, 2026 | 1:59 PM

Congress Maharally Vs BJP Padyatra: दिल्ली रविवारी आंदोलनांनी दणाणून गेली. इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. काँग्रेसच्या महारॅलीला सुरूवात होत आहे. तर त्याचवेळी भाजपने काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला आहे. 1984 मधील शीख दंगलीचा मुद्दा हाती घेत भाजपने एका सभेचे आयोजन केले आणि आता त्यांनी पदयात्रेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या रॅलीच्याच दिवशी भाजपने पदयात्रा काढली आहे. यामुळे दिल्लीत एकाचवेळी दोन आंदोलनांना तोंड फुटले आहे.

खुल्या बसमधून नेते रामलीला मैदानाकडे

Loading...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरापासून एका खुल्या बसमध्ये इंडिया आघाडीचे नेते हे मिंटो रोडपर्यंत जाणार होते. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ते मागील बाजूने रामलीला मैदानाच्या जवळपास थांबतील आणि तिथून इंडिया आघाडीची महारॅलीला सुरूवात होईल. या बसमध्ये सर्वात पुढे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिसले. मागील बाजूला अखिलेश यादव आणि इतर नेते दिसले. इंडिया आघाडीतील 20 पक्ष या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. ममता बॅनर्जीही या आंदोलनासाठी दिल्लीत डेरेदाखल झाल्या आहेत. तर उद्धव सेनेचे खासदारही या रॅलीत दिसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही रॅलीत आगेकूच केले आहे.

हा तर ठगांचा मेळा

भाजपने काँग्रेसच्या महारॅलीवर कडकडून टीका केली आहे. भाजपने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात हा ठगांचा महामेळा असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. 1984 मध्ये शीख विरोधी दंगलीचा उल्लेख करत याच दिवशी शीख समुदायाविरोधात देशातील काही भागात दंगली उसळल्याचा आरोप भाजपने केला आहे. लोकांची घरं जाळण्यात आली आणि अनेकांचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

1984 च्या दंगलीविरोधात भाजपचे प्रदर्शन

1984 मधील दंगलीविरोधात भाजपचे मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या नेतृत्वात भाजपने दिल्लीत प्रदर्शन केले. एक सभाही घेण्यात आली. त्यात काँग्रेसवर घणाघाती टीका करण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीसह देशभरात दंगल उसळली होती. त्यात शीख समुदायाला लक्ष्य करण्यात आले होते. एकीकडे इंडिया आघाडीने महारॅलीचे आयोजन केलेले असतानाच भाजपने हा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसवर निशाणा साधला. तर दिल्लीतील हरिनगर येथून पदयात्रेला सुरुवात केली.

दरम्यान ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. SIR प्रक्रिया आणि कोट्यवधी नागरिकांची नावं मतदार यादीमधून हटवल्याच्याविरोधात महाआंदोलन होत आहे. तर संध्याकाळी होणार्‍या सभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मोठा नवीन खुलासा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या या आंदोलनामुळे दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us