दहशतवादाच्या विरोधात काश्मीरचे लोक रस्त्यावर; म्हणाले, आम्हाला फक्त…
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत असताना जम्मू काश्मीरचे लोकही रस्त्यावर उतरले आहेत. तेथील नागरिक या हल्ल्याची निर्भर्त्सना करत आहेत.
म्हाला हा हिंसाचार नको
पहलगाम येथील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर भागातील काही व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओंमध्ये तेथील नागरिक या हल्ल्याचा निषेध करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर लोकांनी कँडलमार्च काढून हल्ल्याच्या निषेध केला असून मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला हा हिंसाचार नको आहे. आम्हाला आमच्या काश्मीरचे पावित्र्य असेच ठेवायचे आहे, असे म्हणत तेथील नागरिकांकडून दहशतवादी हल्ल्यांना विरोध करत आहेत.
काश्मीरचे नागरिक उतरले रस्त्यावर
या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन धोक्यात येईल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यकटक आमच्यासाठी देवाच्या ठिकाणी आहेत, आम्ही त्यांची काळजी घेणार आहोत, असेही मत तेथील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मराठी भाषेत बोलणारी मुलगी दिसत आहे. या मुलीच्या मागे काही काश्मीरमधील नागरिक दिसत आहे. हे नागरिक काश्मीरमधील हिंसाचार थांबवा अशी मागणी करताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरून बंधूभाव, भारताचं अखंडत्व कायम राहावं, अशी भावना या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील नागरिक पहिल्यांदाच रस्त्यावर आले असून हिंसेला विरोध करत आहेत. काश्मीरच्या परिसरात शांतता हवी आहे, असा निश्चय घेऊन नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे भविष्यात येथील पर्यटन सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका
दरम्यान, या हल्ल्यानंतर भारतातील सैन्य अलर्ट मोडवर गेले आहे. दिल्लीमध्येही अनेक बैठका घेतल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतले आहेत. या हल्ल्यानंतर लवकरच भारत आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे पुढे नेमंक काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
