10 सेकंद ते 1 मिनिटात काय घडलं? हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची लाईट ऑन झाली अन्… विमान अपघातातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितला थरार
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून 265 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून रमेश विश्वकुमार नावाचा एक प्रवाशी जिवंत बचावला. त्याने विमानाच्या टेकऑफनंतर घडलेल्या घटनेचे वर्णन केले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतली. रमेशने आपला बचाव हा एक चमत्कार असल्याचे सांगितले आहे. त्याने अचानक उघडलेल्या विमानाच्या दरवाज्यातून बाहेर पडून जीव वाचवला.

अहमदाबादमधून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याने तब्बल 265 लोकांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवासी तर 24 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या घटनेनंतर संपूर्ण भारताला हादरा बसला आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून या अहमदाबाद विमान अपघातातातून एक प्रवाशी जिवंत बचावला. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. नुकतंच रमेश विश्वकुमारने विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
रमेश विश्वकुमारवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश विश्वकुमार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर रमेश विश्वकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती दिली.
रमेश विश्वकुमार काय म्हणाले?
माझी पंतप्रधान मोदींनी तब्येतीबद्दल विचारपूस केली. त्यासोबतच त्यांनी हे सर्व कसं झालं, याबद्दलही विचारणा केली. हा सर्व अपघात माझ्या नजरेसमोर घडला. मी त्यातून कसा जिवंत राहिलो याबद्दल मला स्वत:ला अजूनही विश्वास बसत नाही. कारण काही क्षणासाठी मलाही वाटलं होतं की मी मरणार आहे. पण जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी जिवंत होतो. यानंतर मी सीटबेल्ट काढला आणि जिथून मला बाहेर पडता येईल अशा ठिकाणाहून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यासमोर एअरहोस्टेस, काही नागरिकांचा मृत्यू झाला होता.
टेकऑफ झाल्यानंतर १ मिनिटाच्या आत ही घटना घडली. टेकऑफ झाल्यानंतर ५ ते १० सेकंदासाठी विमान अडकल्यासारखे वाटले. यानंतर मला वाटलं काही तरी गडबड आहे. यानंतर काही सेकंदात हिरवी आणि पांढऱ्या रंगाची लाईट ऑन झाली. यानंतर ज्याप्रमाणे आपण गाडीला रेस देतो तशाच प्रकारे विमानाचा स्पीड वाढला आणि ते विमान डायरेक्ट हॉस्टेलला धडकले, अशाप्रकारे हे सर्व घडलं.
मी ज्या ठिकाणी बसलो होतो, ती बाजू हॉस्टेलच्या बाजूला नव्हती. माझ्या बाजूला असलेला दरवाजा अचानक उघडला. त्यानंतर थोडी जागा होती, मी त्या जागेतून बाहेर पडू शकतो असे मला वाटले आणि मी त्यातून बाहेर पडलो. जे लोक हॉस्टेलला धडकले ते वाचू शकले नाहीत. कारण तिथेच सर्वात जास्त हानी झाली आहे. मी यातून कसा वाचलो हेच मला माहिती नाही. कारण हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलं. मी उडी मारली नाही. मी सीटसह बाहेर फेकलो गेलो. जेव्हा आग लागली तेव्हा माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली. मला कोणतरी अॅम्बुलन्समध्ये बसवले आणि मी वाचलो, असा घटनाक्रम रमेश विश्वकुमार यांनी सांगितला.