
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. ते एका मागून एक धक्कादायक निर्णय घेत आहेत, त्यांनी आधी जगातील काही प्रमुख देशांवर प्रचंड टॅरिफ लादून टॅरिफ वॉर सुरू केलं, ज्या देशांवर टॅरिफ लावण्यात आला त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली, दरम्यान त्यानंतर त्यांनी व्हिसाबाबत देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले, अनेक देशांना तर त्यांनी अमेरिकेचा व्हिसाच बॅन केला आहे. डोनाल्ड ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करून तेथील राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं सर्व लक्ष हे ग्रीनलँडकडे आहे, त्यांना ग्रीनलँडवर ताबा मिळवायचा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या युरोपीयन देशांवर देखील त्यांनी 10 टक्के टॅरिफ लावला आहे, हा टॅरिफ कधीही वाढू शकतो अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आजपासून लागू होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडणार आहे, ट्रम्प प्रशासनाकडून एक वर्ष आधीच डब्लूएचओला या संदर्भात नोटीस देण्यात आली होती. आरोग्य तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका थेट संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेला बसू शकतो. अमेरिकेचा जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय हा जागतिक कायदे आणि नियमांचं देखील उल्लंघन आहे, अमेरिकेला अद्याप संयुक्त राष्ट्र संघाचे 260 मिलियन डॉलर देणं बाकी आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025 मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्विकारताच पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेला नोटीस दिली होती, की या संघटनेमधून अमेरिका बाहेर पडणार आहे. अमेरिकन कायद्यानुसार जर एखाद्या जागतिक संघटनेमधून बाहेर पडायचं असेल तर अशा वेळी एक वर्ष आधी नोटीस देणं बंधनकारक आहे, अमेरिकेनं नियमानुसार जागतिक आरोग्य संघटनेला एक वर्ष आधी नोटीस दिली होती. अमेरिकेच्या या निर्णयामुळे गरीब देशांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतील सर्वात मोठा दाता देश आहे, अमेरिकेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा फटका हा जागतिक आरोग्य संघटनेला बसणार आहे.