US Tariff On India : ट्रम्प शत्रुसारखे वागूनही भारत-अमेरिकेत लवकरच मोठी डील, आपली मजबुरी आहे, कारण…

US Tariff On India : सध्या डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत शत्रुसारखे वागत आहेत. भारत-अमेरिकेचे संबंध बिघडले आहेत. मात्र, असं असूनही सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशात मोठी डील होऊ शकते. अमेरिकेसोबत हा करार करणं आपला नाईलाज आहे. कारण सध्या तरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीय.

US Tariff On India : ट्रम्प शत्रुसारखे वागूनही भारत-अमेरिकेत लवकरच मोठी डील, आपली मजबुरी आहे, कारण...
Donald Trump
| Updated on: Aug 27, 2025 | 10:49 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला अन्यायकारक वागणूक देत आहेत. भारतावर त्यांनी 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच नुकसान होणार आहे. अनेकांचे रोजगार, नोकऱ्या संकटात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतात संतापाचं वातावरण आहे. भारताला एक न्याय आणि चीनला दुसरा, त्यांच्या या दुटप्पी वागण्यावर भारतात टीका सुरु आहे. मात्र, इतकं सगळं होऊनही भारत आपल्या एअर फोर्सला मजबूत करण्यासाठी अमेरिकेसोबत लवकरच एक डिफेन्स करार करणार आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या संबंध ताणले गेलेले असताना हा करार होणार आहे. अमेरिकेसोबत हा करार करणं भारताचा नाईलाज आहे. भारत आणि अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकमध्ये (GE) सप्टेंबर महिन्यात एक अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 8,300 कोटी रुपयांचा करार होऊ शकतो.

संरक्षण दलातील सूत्रांनुसार, या डील अंतर्गत अमेरिकी कंपनी जीई भारतीय फायटर जेट LCA तेजस मार्क-1A साठी 113 नवीन GE-404 इंजिन्स उपलब्ध करुन देणार आहे. केंद्र सरकारने अलीकडेच 97 LCA तेजस मार्क-1ए विमान खरेदी करायला मंजुरी दिली होती. त्याआधी 83 फायटर जेटसाठी 99 GE-404 इंजिनचा करार झाला आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) 83 विमानांच्या इंजिनसाठी पहिली खेप 2029-30 पर्यंत आणि त्यानंतर 97 विमानांच्या पुरवठ्यासाठी 2033-34 पर्यंत ऑर्डर पूर्ण करायची आहे. जनरल इलेक्ट्रिक दर महिन्याला भारताला दोन इंजिन्सचा पुरवठा करेल. HAL ने 2029-30 पर्यंत 83 फायटर जेट्स एअरफोर्सकडे सोपवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यानंतर 97 विमानांची दुसरी बॅच 2033-34 पर्यंत एअरफोर्सकडे सोपवण्यचा उद्दिष्टय आहे.

किती हजार कोटींचा करार

80 टक्के टेक्नोलॉजी ट्रान्सफरसोबत इंजिन देण्याच्या एका डीलवर HAL ची जीई कंपनीसोबत चर्चा सुरु आहे. GE-414 इंजिनची ही डील आहे. जवळपास 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 12,500 कोटी रुपयांच्या या डीलवर पुढच्या काही महिन्यात स्वाक्षरी होईल, अशी अपेक्षा आहे. या अंतर्गत भारताला LCA मार्क-2 आणि Advance मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी (AMCA) आवश्यक 200 जीई-414 इंजिन उपलब्ध करुन दिले जातील. जीई-414 इंजिनचा वापर 162 LCA मार्क 2 विमानं आणि AMCA 10 प्रोटोटाइपमध्ये केला जाईल.

अमेरिकेसोबत करार करणं भारताचा नाईलाज

भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाने तेजस विमानाची निर्मिती केली. पण फायटर जेटसाठी लागणारं इंजिनच तंत्रज्ञान विकसित करताना भारताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे HAL ला वेळेवर इंडियन एअर फोर्सची ऑर्डर पूर्ण करता येत नाहीय. मिग-21 फायटर जेट्स निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ही विमान गेल्यानंतर त्यांच्याजागी स्क्वाड्रन्सची मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ती भरुन काढण्यासाठी भारतीय हवाई दलाला तातडीने फायटर विमानांची आवश्यकता आहे. तेजसची ऑर्डर दिलीय. पण इंजिन नसल्याने वेळेवर वायू दलाला पुरवठा होत नाहीय. त्यामुळे अमेरिकेसोबत करार करणं हा भारताचा नाईलाज आहे.