औरंगजेब… तो तर नथुराम गोडसेपेक्षा चांगला होता, स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदुत्ववाद्यांना डिवचले, अबू आझमींच्या पाठिंब्यासाठी मैदानात

Aurangzeb better than Nathuram Godse : सध्या देशात औरंगजेबावरून वातावरण तापवण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केलेली असतानाच आता नथुराम गोडसेवरून विरोधकांनी हल्ला चढवला आहे.

औरंगजेब... तो तर नथुराम गोडसेपेक्षा चांगला होता, स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदुत्ववाद्यांना डिवचले, अबू आझमींच्या पाठिंब्यासाठी मैदानात
हिंदुत्ववाद्यांना डिवचले
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 16, 2025 | 3:04 PM

सध्या देशात औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून वाद सुरू आहे. छावा चित्रपटाच्या आडून राजकारण तापवण्यात अनेकांना यश आले आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना अचानक औरंजेबाचा उमाळा आला होता. त्यांनी औरंगजेबाची आरतीच ओवळली. त्यावरून मग वातावरण तापले. त्यातच आता समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी असा प्रवास केलेले उत्तर प्रदेशातील बडे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी तर अजून एक टोक गाठले. औरंगजेब हा तर नथुराम गोडसे पेक्षा अधिक चांगला होता, असे विधान करत त्यांनी हिंदुत्ववाद्यांना चांगलेच डिवचले आहे.

भाजपा देशात द्वेष पसरवतोय

स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. भाजपा देशात द्वेष पसरवत असल्याचा गंभीर आरोप मौर्य यांनी केला. त्यामुळे देशातील विविध भागात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे ते म्हणाले. औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर आणि सर्वात वाईट बादशाह मानण्यात येतो. तो वाईट होता. पण तो नथुराम गोडसेपेक्षा अधिक चांगला होता हे माझे म्हणणे आहे, असे मौर्या म्हणाले. नथुराम गोडसे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. जे लोक दुसऱ्याकडे बोट दाखवतात, त्यांनी अगोदर आपल्या व्यक्तित्वाकडे पाहावे असा टोला मौर्या यांनी लगावला.

अबू आझमींचे वक्तव्य काय?

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे साम्राज्य अफगाणिस्तानपासून ते ब्रह्मदेश(म्यानमार)पर्यंत असल्याचे म्हटले होते. औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरं बांधली. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील युद्धाविषयी बोलताना ती राजकीय लढाई होती असे अबू आझमी यांनी म्हटले होते. महाविकास आघाडीतील नेते आझमी यांना भाजपाची बी टीम म्हणतात. तर इंडिया आघाडीत समाजवादी पक्ष आहे, हे विशेष.

रामदास आठवलेंनी आझमींना फटकारले

औरंगजेबाची कबर ही अनेक वर्षांपासून तिथे आहे. तो 1600-1700 या कालावधीत दख्खनमध्ये आला. औरंगजेबाची स्तुती करणे योग्य नाही. अबू आझमी यांनी असे बोलणे योग्य नाही, असे रामदास आठवले यांनी फटकारले. कबर इतक्या वर्षांपासून आहे, ती हटवण्याची गरज नाही, असे मला वाटते. औरंगजेबाला आम्ही गाडले, हे येणार्‍या पिढ्यांना कळावे म्हणून त्याची कबर असायला हवी, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.