दिल्लीतील बाबर रोडच्या जागी अयोध्या मार्ग, हिंदू सेनेने लावले पोस्टर
हिंदू सेनेने शनिवारी दिल्लीतील बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिटकवल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही बाबर रोडसह इतर मुघल शासकांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती.

नवी दिल्ली : एकीकडे अयोध्येत रामललाच्या (Ramlala) प्राणप्रतिष्ठापणेचा विधी सुरू आहेत, तर दुसरीकडे दिल्लीतील बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. हिंदू सेनेने शनिवारी दिल्लीतील बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिटकवल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही बाबर रोडसह इतर मुघल शासकांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम सुरू आहेत. सगळीकडे सध्या राममय वातावरण झाले असताना, अशा वेळी हिंदू सेनेने हे पोस्टर चिकटवून पुन्हा एकदा ही मागणी लावून धरली आहे.
मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकी याने अयोध्येतील राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधल्याचे सांगितले जाते. यानंतर अनेक वाद झाले. अनेकांना जीव गमवावा लागला होता. आज 500 वर्षांनंतर अयोध्येत त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले जाणार आहे. रामलल्लाच्या अभिषेकने हिंदू संघटनांचा मुघल विरोध पुन्हा एकदा समोर आला आहे.
गर्भगृहात रामललाच्या नवीन मूर्तीची स्थापना
22 जानेवारीला अयोध्येत रामललाची प्राण प्रतिष्ठापणा आणि भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. पुजाऱ्यांनीही मंदिर परिसर आणि गर्भगृहात पूजेचा विधी सुरू केला आहे. तब्बल 500 वर्षांनंतर रामलला आता भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत.
अयोध्येला छावणीचे स्वरूप
राम मंदिराच्या उद्घाटनाची विशेष तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः उद्घाटनाच्या कामाचा आढावा घेत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पोहोचून अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बांधकामाचा आढावा घेतला. राम मंदिरात मोठ्या संख्येने व्हीव्हीआयपी येणार आहेत. या संदर्भात प्रत्येक कानाकोपऱ्यात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. सध्या अयोध्येला छावणीचे स्वरूप आले आहे. 22 जानेवारीला फक्त निमंत्रीत असलेल्या मान्यवरांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले होणार आहे.
